Vinayak Mete Accident : ड्रायव्हर सातत्याने जबाब बदलतो; अजित पवारांनी मेटेंच्या अपघातावर उपस्थित केली शंका
आज अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघातावर विधानभवनात चर्चा झाली. ड्रायव्हर सातत्याने जबाब बदलतो त्यामुळे मेटेंच्या अपघाताबाबत शंका उपस्थित होते असं यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.
मुंबई : आज अधिवेशनाचा (monsoon session) तिसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघातावर विधानभवनात चर्चा झाली. ड्रायव्हर सातत्याने जबाब बदलतो त्यामुळे मेटेंच्या अपघाताबाबत शंका उपस्थित होते असं यावेळी बोलताना अजित पवार (Ajit Pawar) यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना अजित पवार यांनी म्हटलं आहे की, याच संंदर्भात मला मेटे यांच्या पत्नीचा देखील फोन आला होता. त्यांनी काही मुद्दे उपस्थित केले. ज्यामध्ये पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे का? अपघाताच्या तपासात काही चालढकल होत आहे का? अपघाताची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे का? असे विविध प्रश्न उपस्थित होत असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच एक्सप्रेस वे एकूण आठ लेनचा करावा, त्यामध्ये दोन लेन या स्वतंत्रपणे ट्रकसाठीच ठेवण्यात याव्यात अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
पोलिसांनी चालढकल करू नये
दरम्यान यावेळी बोलताना अजित पवार यांनी पोलिसांच्या सीमावरून होणाऱ्या वादाचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे. बऱ्याचदा असे होते की, अपघात कोणत्या क्षेत्रात झाला ते आपले क्षेत्र नाही म्हणून पोलीस वेळेवर पोहोचत नाही. उदाहारणार्थ समजा अपघात जर नवी मुंबई पोलीस हद्दीत झाला असेल आणि अपघाताबाबत रायगड पोलिसांना फोन गेला तर त्यांनी जबाबदारी न टाळता तातडीने अपघातस्थळी पोहोचले पाहिजे. त्यानंतर तुम्ही पुढील कारवाईसाठी नवी मुंबईला पोलिसांना सांगू शकता. मात्र हद्दीचा प्रश्न उपस्थित करून टाळाटाळ करता कामा नये असे अजित पवार यांनी म्हटले आहे.
एक्सप्रेस वे 8 लेनचा करण्याची मागणी
एक्सप्रेस वे आठ लेनचा करावा, त्यामधील दोन लेन या स्वातंत्र्यपणे ट्रकसाठीच ठेवण्यात याव्यात. अनेकदा ड्रायव्हरला ओव्हरटेक करावे लागते. मात्र अशा पद्धतीने ओव्हरटेक करताना वेगळ्या लेनची आवश्यकता असल्याचे यावेळी बोलताना अजित पवार यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे मेटे यांच्या चालकाने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. अपघातानंतर त्यांच्या चालकाला योग्य लोकेशन सांगता आले नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.