Video : भाजप-राष्ट्रवादी युती फिक्स झाली होती, अंडरलाईन करतो… चार दिवस आधी काय घडलं?; फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट

| Updated on: Jun 29, 2023 | 9:59 AM

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आशीर्वादानेच राज्यात भाजप-राष्ट्रवादीचं सरकार येणार होतं. त्यातूनच आम्ही पहाटेचा शपथविधी उरकला. त्यानंतर जे झालं ते तुम्हाला माहीत आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

Video : भाजप-राष्ट्रवादी युती फिक्स झाली होती, अंडरलाईन करतो... चार दिवस आधी काय घडलं?; फडणवीस यांचा मोठा गौप्यस्फोट
devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा काही पिच्छा सोडताना दिसत नाहीये. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवार यांच्या आशीर्वादानेच पहाटेचा शपथविधी झाला होता. किंबहुना भाजप आणि राष्ट्रवादीचं सरकार यावं म्हणून शरद पवार यांनीच पुढाकार घेतला होता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिकन भारत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजप आणि राष्ट्रवादीची सत्ता येण्यासाठी कशी तयारी झाली होती? शरद पवार यांच्या उपस्थितीत कशा बैठका पार पडल्या होत्या याची माहितीच दिली आहे. राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार राज्यात स्थापन करण्यासाठी शरद पवार यांच्यासोबत आमची बैठक झाली होती. हे मी अंडरलाईन करतोय. त्या बैठकीत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचं ठरलं. कोणत्या प्रकारे सरकार स्थापन करायचं याची मोड्स ऑपरेंडी तयार झाली. सरकार स्थापनेचा करारही झाला होता. अजित पवार आणि मी हे पुढे नेणार असं ठरलं. आम्हा दोघांना अधिकार दिले गेले. त्या हिशोबाने आम्ही संपूर्ण तयारी केली. तयारीनंतर एका वेळी पवार त्यातून हटले. आमच्या शपथविधीच्या तीन चार दिवस आधी शरद पवार यांनी माघार घेतली, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला.

हे सुद्धा वाचा

चार दिवस आधी माघार

शरद पवार यांनी सर्व काही ठरलेलं असताना चार दिवस आधीच माघार घेतली. त्यामुळे अजित पवारांकडे दुसरा पर्याय नव्हता. आम्ही सत्ता स्थापनेची सर्व तयारी केली होती. त्यामुळे अजित पवारसोबत आम्ही सरकार स्थापन केलं. शरद पवार यांनीच सरकार स्थापनेसाटी पुढाकार घेतला होता. त्यामुळे आपण शपथ घेऊ. शरद पवार आपल्यासोबत येतील. राष्ट्रवादीचे आमदारही सोबत येतील असं अजितदादांना वाटलं होतं म्हणूनच शपथविधी झाला होता, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.

म्हणून पायउतार झालो

पण सर्व ठरूनही शरद पवार आमच्यासोबत आले नाही. कोर्टात जे झालं ते तुम्ही पाहिलं. त्यानंतर आम्हाला सरकारमधून पायऊतार व्हावं लागलं. आम्ही सरकार बनवण्याचा जो निर्णय घेतला होता, त्याची सुरुवात शरद पवार यांच्याशी चर्चा करूनच झाली होती, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मिस्ट्री समजायची असेल तर…

शरद पवार यांची मिस्ट्री समजायची असेल तर त्यांच्या हिस्ट्रीत जावं लागेल. तेव्हाच त्यांची मिस्ट्री समजेल. उद्धव ठाकरे यांनी आमच्याशी नातं तोडलं होतं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू केली होती. त्यांची चर्चा पुढे जात असताना उद्धव ठाकरे आमच्यासोबत येणार नाहीत हे आमच्या लक्षात आलं होतं. कारण ते आमचा फोनही उचलत नव्हते.

त्यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची खुणावत होती. त्यामुळे आपल्यासमोर काय पर्याय आहे याचा आम्ही शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा आम्हाला राष्ट्रवादीच्या लोकांनी आम्ही तुमच्यासोबत येऊ शकतो असं सांगितलं. आम्हाला स्थिर सरकार हवं, असं राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगितलं. त्यामुळे आमची राष्ट्रवादीसोबत चर्चा सुरू झाली, असा दावाही त्यांनी केला.