Arjun Khotkar : शिवसेना नेते अर्जुन खोतकरांना ईडीचा दणका; 78 कोटींची मालमत्ता जप्त
मनी लाँड्रिंग प्रकरणात शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. रामनगर येथील जालना सहकारी साखर कारखान्याची 200 एकर जमीन, कारखाना इमारत आणि मशीन अशी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.
जालना : मनी लाँड्रिंग (Money laundering) प्रकरणात शिवसेना नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. रामनगर येथील जालना सहकारी साखर कारखान्याची 200 एकर जमीन, कारखाना इमारत आणि मशीन अशी मालमत्ता ईडीकडून (ED) जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या संबंधित मालमत्तेची एकूण किंमत 78 कोटी 38 लाख रुपये असल्याची माहिती ईडीच्या वतीने देण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेली मालमत्ता ही अर्जुन खोतकर यांच्याशी संबंधित असल्याचे ईडीने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. राज्यात सध्या वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केली आहे. त्यांना शिवसेनेतील 40 पेक्षा अधिक आमदारांनी पाठिंबा दिला आहे. दुसरीकडे ईडीला घाबरून या आमदारांनी पळ काढल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात येत आहे. आता या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांच्यावर ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे.
नेमकं प्रकरण काय?
ईडीकडून ज्या कारखान्यावर कारवाई करण्यात आली, तो जालना सहकारी साखर कारखाना मे. अर्जुन शुगर इंडस्ट्रीज या कंपनीच्या मालकीचा आहे. या कारखान्याच्या लिलावात आणि विक्रीवेळी कायद्यातील तरतुदींचा भंग झाल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. थकलेल्या कर्जाच्या वसुलीसाठी या कारखान्याचा लिलाव करण्यात आला होता. हा कारखाना अवघ्या 42 कोटी 31 लाख रुपयांना विकण्यात आला. मात्र त्यानंतर ईडीने स्वतंत्रपणे या मालमत्तेचे सर्वेक्षण केल्यानंतर या कारखान्याच्या मालमत्तेची एकूण किंमत 78 कोटींपेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे. आता या प्रकरणात ईडीच्या वतीने अर्जुन खोतकर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
अर्जुन खोतकर यांची प्रतिक्रिया
दरम्यान या कारवाईबाबत बोलताना खोतकर यांनी म्हटले आहे की, ईडी ही स्वतंत्र यंत्रणा आहे, त्यांनी साखर कारखान्याची संपत्ती जप्त केली आहे. याविरोधात आपण कोर्टात दाद मागणार आहोत. हा लढा कायदेशीर मार्गाने लढणार आहोत. सध्या राजाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. ईडी आणि सीबीआयच्या भीतीने आमदारांनी पळ काढल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता अर्जुन खोतकर यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईची चर्चा सुरू झाली आहे.