Sanjay Raut : संजय राऊतांच्या घरी ईडीचं पथक दाखल; जाणून घ्या नेमकं काय आहे ‘पत्राचाळ’ प्रकरण? ज्यामुळे राऊतांच्या अडचणी वाढल्या
शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असल्याचे पहायला मिळत आहे. आता पत्राचाळ प्रकरणात ईडीचं (ED) पथक आज संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले आहे.
मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीमध्ये दिवसेंदिवस वाढच होत असल्याचे पहायला मिळत आहे. आता पत्राचाळ प्रकरणात ईडीचं (ED) पथक आज संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले आहे. पत्राचाळ (PatraChaal) प्रकरणात काही दिवसांपूर्वी ईडीने खासदार संजय राऊत यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते, मात्र तेव्हा चौकशीला हजर न राहता संसदेच्या अधिवेशनाचे कारण सांगून संजय राऊत यांनी चौकशीसाठी मुदतवाढ मागितली होती. मात्र आता अचानक आज ईडीचे पथक संजय राऊत यांच्या घरी दाखल झाले आहे. ईडीच्या पथकाकडून संजय राऊत यांची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान राऊतांच्या अडचणी ज्या पत्राचाळ प्रकरणामुळे वाढल्या आहेत. ज्या प्रकरणामुळे सध्या संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे, ते पत्राचाळ प्रकरण नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात.
काय आहे पत्राचाळ प्रकरण?
पत्राचाळ जमीन घोटाळा तब्बल 1,034 कोटी रुपयांचा असल्याचे बोलले जात आहे. याच प्रकरणात आता संजय राऊत यांची चौकशी सुरू आहे. मुंबईच्या गोरेगावमधील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र प्राधिकरण अर्थात म्हाडाचा एक भूखंड होता. हा भूखंड विकसीत करण्यासाठी प्रवीण राऊत यांच्या मालकीच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आला होता. ठरलेला कराराप्रमाणे संबंधित कंपनीला या जागेवर तीन हजार फ्लॅटचे बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 हे भाडकरूंना तर उर्वरित फ्लॅट हे म्हाडा आणि कंपनी यांनी वाटून घ्यायचे होते. मात्र या प्रकरणात प्रवीण राऊत यांनी पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप ईडीच्या वतीने करण्यात याला आहे. याच प्रकरणात संजय राऊत यांची आज चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. ईडीकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार कराराचे पालन न करता आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीने या चाळीचा काही भाग हा खासगी बिल्डरांना विकला आहे. 2011, 2012 आणि 2013 मध्ये या भूखंडाचे अनेक भाग हे खासगी बिल्डरांना हस्तांतरित केल्याचा आरोप ईडीच्या वतीने करण्यात आला आहे.
दहा अधिकाऱ्यांकडून राऊत यांची चौकशी
दरम्यान आज संजय राऊत यांच्या घरी ईडीचे पथक दाखल झाले आहे. सध्या संजय राऊत यांची ईडीच्या दहा अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असल्याची माहिती त्यांचे भाऊ सुनिल राऊत यांनी दिली आहे. चौकशी कितीवेळ चालणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.