फडणवीस पक्षात असेपर्यंत न्याय मिळणार नाही, म्हणून पक्ष सोडला : एकनाथ खडसे
व्यक्तीगत कारणामुळे किंवा व्यक्तीगत छळामुळे मी हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला," असे एकनाथ खडसे म्हणाले. (Eknath Khadse Criticism on Devendra fadnavis)
जळगाव : “भाजप नेते देवेंद्र फडणवीस जोपर्यंत पक्षात आहेत, तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. अशी माझी भावना झाली, म्हणून मी पक्ष सोडला,” अशी प्रतिक्रिया भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत प्रवेश करणारे नेते एकनाथ खडसे यांनी दिली. ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधताना त्यांनी अनेक विषयांवर गौप्यस्फोट केले. (Eknath Khadse Criticism on Devendra fadnavis)
“मी वारंवार वरिष्ठांकडे तक्रारी केल्या. मी जे.पी. नड्डा यांना भेटलो, तासभर चर्चा केली. अमित शाह, मोदी यांनाही भेटलो. नितीन गडकरी यांचीही भेट घेतली. चार वर्षात गडकरींसह सर्व नेत्यांची भेट घेतली. सर्वांकडे तक्रार केली. माझा दोष सांगा, गुन्हा सांगा, केला असेल तर शिक्षा मिळाली पाहिजे, हे सर्वांनी नीट ऐकून घेतलं.”
“पण देवेंद्र फडणवीस हाच अंतिम निर्णय पक्षात असल्याने त्यांनी घेतलेला विधानसभेच्या तिकीटाचा निर्णय असो किंवा इतर कोणाताही निर्णय असो, शेवटी देवेंद्र फडणवीस सांगतील तेच होतं गेलं आणि फडणवीस जोपर्यंत पक्षात आहेत, तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही अशी माझी भावना झाली. या व्यक्तीगत कारणामुळे किंवा व्यक्तीगत छळामुळे मी हा पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला,” असे एकनाथ खडसे म्हणाले.
“फडणवीसांना विलन ठरवलं नाही. कोणत्याही निर्णयाचे चांगले-वाईट परिणाम होतात. चांगले परिणाम झाले तर गुणगाण होतं. जे वाईट झालं ते नेतृत्वाने का स्वीकारु नये?” असा प्रश्नही खडसेंनी उपस्थित केला.
“अलिकडच्या काळात माझ्यासोबत व्यक्तीगत घटना घडल्या आहेत त्या वेदनादाय होत्या. माझ्या चौकश्या केला. मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. याचा मला प्रचंड मनस्ताप झाला.”
“देवेंद्र यांना दोष का दिला? विनयभंगाचा खटला कसा दाखल झाला. माझं भाषण मुक्ताईनगरला सुरु होतं. भाषणात मी काहीच अश्लील बोललो नाही. माझ्या शेताच्या आंब्याचा विषय होता. यावरुन अंजली दमानिया यांनी गुन्हा दाखल करायला भाग पाडलं. वास्तविक विनयभंगाचा गुन्हा करायचा असेल तर समोर व्यक्ती लागते. कुणी अमेरिकेत राहिलं आणि मी मुक्ताईनगरला राहिलो तर तसे गुन्हे दाखल होत नाहीत,” असेही खडसे म्हणाले.
“भाजपला आज अच्छे दिवस आल्याचा आनंद”
“भाजप स्थापन झाल्यापासून पक्षाचं काम एकनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे केलं. त्या कालखंडात परिस्थिती फार अवघड होती. आणीबाणी नंतर भारतीय जनता पार्टीची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ती जनमानसात रुजलेली नव्हती. कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी नव्हते. त्यावेळी गावागावांत उपेक्षा सहन करावी लागायची. पण सर्वांच्या मेहनतीने भाजपला आज अच्छे दिवस आले. त्याचा मला नेहमी आनंद राहिला आहे.”
“पूर्वीच्या कालखंडातील आमचे नेते सामूहिक नेतृत्वाच्या अनुषंगाने काम करायचे. सर्वांशी सल्लामसलत करुन निर्णय व्हायचा. तो सर्वांकडून मान्य करुन निर्णय व्हायचा. पण अलिकडच्या काळात भाजप व्यक्तीगत आहे. एकाच व्यक्तीने निर्णय घ्यावा आणि त्याची अंमलबजावणी करावी, अशा स्वारुपाची आहे. निर्णय आधीच ठरलेला असायचा, फक्त नावापुरता विचारलं जायचं.” असेही खडसेंनी यावेळी सांगितले. (Eknath Khadse Criticism on Devendra fadnavis)
संबंधित बातम्या :
‘खडसे सिर्फ झांकी है, बहुत कुछ बाकी है’; मुश्रीफ यांचा सूचक इशारा
…आणि मुक्ताईनगरच्या कार्यालयावर 40 वर्षांपासून असलेली भाजपची ओळख एका रात्रीत नाहिशी