Eknath Khadse : ‘पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळात घेतील की नाही शंका’, एकनाथ खडसेंचा पंकजाताईंना महत्वाचा सल्ला
पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावरुन आता जोरदार चर्चा सुरु झालीय. पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पंकजा मुंडेंना महत्वाचा सल्ला दिलाय.
जळगाव : शिंदे आणि फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) एकाही महिला आमदाराला स्थान मिळालं नाही. त्यावरुन विरोधी पक्षातील नेते जोरदार टीका करत आहेत. अशावेळी भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि बड्या नेत्या पंकजा मुंडे यांच्या एका वक्तव्यानं राजकारणात चर्चेला उधाण आलंय. पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या नावाची नेहमीप्रमाणे चर्चा झाली. मात्र, यावेळीही त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. याबाबत विचारलं असता आज त्यांना माझी पात्रता वाटत नसेल म्हणून मला मंत्रिपद दिलं नाही, असं वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता जोरदार चर्चा सुरु झालीय. पूर्वाश्रमीचे भाजप नेते आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी पंकजा मुंडेंना महत्वाचा सल्ला दिलाय.
एकनाथ खडसे म्हणाले की, मंत्रिमंडळाचा विस्तार अपूर्ण दिसतोय. पुढच्या कालखंडात आणखी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. गोपीनाथ मुंडे यांच्या परिवाराशी जे कुणी संबंधित आहेत, पंकजा मुंडे असो वा इतर त्यांच्याव सातत्याने अन्याय केला जात आहे. आताही पंकजाताईंना मंत्रिमंडळात घेतील की नाही याबाबत शंका आहे. पंकजा मुंडे यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आता त्यांनी अजून वाट न पाहता वरिष्ठांना भेटावं, असा सल्ला एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडेंना दिलाय.
पंकजा मुंडेंचं नेमकं वक्तव्य काय?
पंकजा मुंडे म्हणाल्या की, अशा चर्चा माध्यमांमधून, माझ्या कार्यकर्त्यांमधून होत असतात. पण त्यांना वाटलं असेल की यांची पात्रता नाही, म्हणून दिलं नसेल. पण जेव्हा त्यांना वाटेल की पंकजा मुंडेंची पात्रता आहे तेव्हा ते देतील. पण आज मी शांत आहे, माझे कार्यकर्ते शांत आहेत. या सगळ्यात माझा काही रोल असणार नाही. मी जे काम करते ते स्वाभिमानाने आणि इज्जतीने राजकारण करते, असं पंकजा मुंडे यांनी आवर्जुन सांगितलं.
जयंत पाटलांनी बोलणं टाळलं
मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याचं त्यांच्या वक्तव्यावरुन वाटतं का? असा प्रश्न विचारला असता पाटील म्हणाले की, शिववसेनेचा शिंदे गट आहे त्यांच्यात प्रचंड नाराजी आहे. भाजपमधील नाराजीची मला माहिती नाही. पण शिंदे गटातील नाराजी वेगवेगळ्या वेळी व्यक्त होताना दिसत आहे. त्यामुळे एका विशिष्ट उद्देशानं, सत्ता मिळवण्यासाठी ही आघाडी झाली आहे, त्यामुळे सत्तेचा वाटा मिळाला नाही तर ते नाराज राहणारच, असं सांगत पाटील यांनी पंकजांच्या नाराजीबाबत बोलणं टाळलं.
सचिन अहिर यांचा भाजपला टोला
पंकजा मुंडे ह्या गोपीनाथ मुंडेंच्या विचारांचा वारसा चालवत आहेत. असे असताना देखील त्यांना मंत्रिपदाबाबत सातत्याने डावलले जात आहे. त्यांना मंत्रिपद मिळावे ही सर्वांचीच इच्छा असते पण शेवटी भाजप पक्षाचा अंतर्गत विषय असल्याचे म्हणत आमदार सचिन अहिर यांनी भाजपावर खोचक टीका केली आहे.