किशोरी पाटील, Tv9 मराठी | 30 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे. एकनाथ खडसे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेतकरी आक्रोश मेळाव्यात भाषण करताना गिरीश महाजन यांना लक्ष्य केलं. “जिल्ह्यात तीन-तीन मंत्री असताना कोणते धरण पूर्ण केलं? जे धरण दिसत आहेत ते काम नाथाभाऊने पूर्ण केलं. 10 वर्ष झाले मंत्री आहेत, पण पाडळसरे धरणाला दमडी दिली नाही. यांना बुटाने हाणलं पाहिजे”, अशा शब्दांत प्रत्यक्ष नाव न घेता खडसेंनी गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला.
“या जिल्ह्यात तुम्ही तीन-तीन मंत्री आहात, कोणत्या सिंचनाचं काम केलं? कोणतं धरण पूर्ण केलं? अरे जे धरण दिसत आहेत ते नाथाभाऊचे आहेत. काही धरणे सोडले ते बाकीचे नाथाभाऊंनी केले. मी शंभर टक्के धरणे बांधले. मी पाडळसरे धरण बांधलं. अरे पण 10 वर्षे त्या खात्याचे मंत्री होता, दमडी दिली नाही. बुटाने मारलं पाहिजे की नाही?”, असा घणाघात एकनाथ खडसेंनी केला.
विशेष म्हणजे नुकतंच गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या आजारपणावर टीका केली होती. महाजनांच्या टीकेला एकनाथ खडसेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. “गिरीश महाजनांनी वैद्यकीय शिक्षण विभागात चाळे केले, त्यामुळे त्यांची त्या विभागातून हकालपट्टी झाली. गिरीश महाजन यांना माझं आव्हान आहे, त्यांनी माझ्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करावी. माझा आजार खरा आहे की खोटा आहे हे त्यांनी तपासून घ्यावं. माझा आजार खोटा आहे, सहानुभूतू मिळवण्याच्या दृष्टीकोनाने केलं आहे, हे त्यांनी सिद्ध केलं तर गिरीश महाजन यांनी मला भर चौकात जोडे मारावे. गिरीश महाजन खरे मर्द असाल आणि मर्दाचे अवलाद असाल तर हे सगळं पाहिल्यानंतर मी तुम्हाला भर चौकात जोडे मारायला तयार आहे. मला वाटतं गिरीश महाजन माझं हे आव्हान स्वीकारतील आणि जोडे खायला तयार होतील. माझं चुकलं असेल तर मी जोडे खायला तयार आहे. पण गिरीश महाजन यांना नाथाभाऊ नावाचा कावीळ झालाय”, अशा शब्दांत खडसेंनी सडकून टीका केली होती.