खडसेंचा पत्ता जवळपास कट, मुलीला तिकीट देणार?
भाजपच्या पहिल्या यादीत नाव न आल्यानंतर खडसे (Rohini Eknath Khadse) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना भाजपच्या दुसऱ्या यादीतही तिकीट मिळण्याची शक्यता कमीच आहे. कारण, त्यांची कन्या रोहिणी खडसे खेवलकर (Rohini Eknath Khadse) यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपच्या पहिल्या यादीत नाव न आल्यानंतर खडसे (Rohini Eknath Khadse) यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
खडसेंचं नाव पहिल्या यादीत नसल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते कालपासून रस्त्यावर उतरले आहेत. मुक्ताईनगर येथील खडसेंच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी जमा होत जोरदार घोषणाबाजी केली. खडसेंना तिकीट न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा कार्यकर्त्यांकडून देण्यात आला आहे.
गेल्या सहा वेळेपासून भाजपाकडून मुक्ताईनगरातून निवडून येणारे खडसे त्यांचं पहिल्या यादीत नाव नसल्याने कमालीचे निराश झाले आहेत. मंगळवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत पुढच्या यादीत नाव येईल असा आशावाद व्यक्त केला.
पक्षाशी प्रामाणिक राहणे, हा गुन्हा असेल तर तो गुन्हा मी केला आहे, अशी हताश प्रतिक्रिया खडसेंनी दिली. दरम्यान, एकेकाळी खडसे तिकीट वाटप करायचे. पण आज त्यांच्याच तिकिटाबद्दल त्यांना माहित नाही. यावर खडसे म्हणाले, आज मुहूर्त चांगला असल्यामुळे मी माझा अर्ज दाखल केला. त्यासाठी आज यादीमध्ये नाव आहे की नाही, याची वाट बघितली नाही. आणखी एक यादी येण्याची शक्यता आहे, त्यामुळे मी माझा अर्ज भरलेला आहे आणि यादीची वाट पाहतो आहे. त्याबद्दल मी वरिष्ठांशीही बोलणार आहे.”
रावेरचे आमदार हरिभाऊ जावळे यांनीही भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. पण अगदी काही किमीवर असलेल्या मुक्ताईनगरकडे महाजनांनी पाठ फिरवली.