‘गिरीश महाजन बायकांच्या मागे फिरतो, फक्त पोरींचे फोन उचलतो’, एकनाथ खडसेंची वादग्रस्त ऑडिओ क्लीप व्हायरल
एकनाथ खडसे यांनी मग मग तुमचा आमदार गिरीश मेला का?, असे वक्तव्य केले. | Eknath Khadse girish Mahajan
मुंबई: जळगावच्या राजकारणातील कट्टर वैरी असलेल्या एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील द्वंद्व आता आणखीनच रंगण्याची चिन्हे आहेत. कारण, एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या दूरध्वनीवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल झाली आहे. या क्लीपमध्ये जामनेरमधील एक ग्रामस्थ पाणी नसल्याची तक्रार एकनाथ खडसे यांना करताना ऐकू येत आहे. त्यावर एकनाथ खडसे यांनी मग मग तुमचा आमदार गिरीश मेला का?, असे वक्तव्य केले. (Eknath Khadse controversial statement about girish Mahajan)
याशिवाय, एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्याविषयी अनेक आक्षेपार्ह विधाने केली आहेत. ही क्लीप व्हायरल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या काही प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्कही साधला. तेव्हा एकनाथ खडसे यांनी तो आवाज माझाच असल्याची कबुली दिली. खानदेशी भाषेत आपण ‘ अमका तमका मेला का?’, असे सहज म्हणून जातो. ही बोलीभाषा आहे. त्यामुळे यामध्ये काही विशेष नाही, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.
एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले?
जामनेरच्या वाकोदजवळ असलेल्या वडगाव बुद्रूक गावातील एका गावकऱ्याने एकनाथ खडसे यांना फोन केला होता. त्याने आपल्या गावात पाणी नसल्याची समस्या मांडली. त्यावर एकनाथ खडसे यांनी तुमचा आमदार गिरीश इकडे-तिकडे बायकांच्यामागे फिरतोय का , असे म्हटले. त्यावर गावकऱ्याने गिरीश महाजन आपला फोन उचलत नसल्याचे सांगितले. तेव्हा एकनाथ खडसे यांनी, तो (गिरीश महाजन) फक्त पोरींचेच फोन उचलतो, असे म्हटले. तसेच आपल्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवायचे सोडून गिरीश महाजन पश्चिम बंगालमध्ये काय फिरत बसलेत, अशी टिप्पणीही एकनाथ खडसे यांनी केली.
एकनाथ खडसेंचं वय झालंय, मानसिक संतुलन बिघडलंय: गिरीश महाजन
ही ऑडिओ क्लीप व्हायरल झाल्यानंतर याविषयी गिरीश महाजन यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा गिरीश महाजन यांनी म्हटले की, यामध्ये एकनाथ खडसे यांचा दोष नाही. वाढते वय, अनेक आजार यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. राष्ट्रवादीत जाऊन त्यांना आमदारकी मिळाली नाही. त्यांच्या मुलीलाही लोकांनी नाकारले. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली. (Eknath Khadse controversial statement about girish Mahajan)