Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांना उद्धव यांच्याकडून एक अखेरची संधी, राष्ट्रीय कार्यकारिणीत कोणतीही कारवाई नाही!
एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून या दोघांना अखेरची संधी देण्यात आली आहे का? अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.
मुंबई : शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजलीय. शिवसेनेत मोठा भूकंप पाहायला मिळतोय. अशावेळी डॅमेज कंट्रोलसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे स्वत: मैदानात उतरले आहेत. शिवसेना भवनात पक्ष कार्यकारिणीची बैठक आज पार पडली. त्यात शिवसेनेचे नेते, आमदार, खासदार उपस्थित होते. फक्त एकनाथ शिंदे आणि रामदास कदम (Ramdas Kadam) हे दोन नेते अनुपस्थित होते. शिंदे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदार आणि नेत्यांवर कारवाई होणार का? असा सवाल विचारला जात होता. मात्र, आज एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून या दोघांना अखेरची संधी देण्यात आली आहे का? अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहे.
कार्यकारिणी बैठकीत एकनाथ शिंदे आणि रामदास कदम यांना शिवसेना नेतेपदावरुन हटवलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, बैठकीत असा कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे शिंदे आणि कदम हे दोघेही शिवसेनेच्या नेतेपदावर अद्यापही कायम आहेत. त्यामुळे शिवसेना अजूनही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळतंय. एकनाथ शिंदे यांच्या बंडात रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदमही सहभागी आहेत. तसंच रामदास कदम हे देखील शिवसेनेत नाराज आहेत. तसंच मधल्या काळात एका कथित ऑडिओ क्लिपवरुन उद्धव ठाकरे हे देखील कदम यांच्यावर नाराज आहेत. अशास्थितीत या दोन्ही नेत्यांवर कारवाई होणार असं सांगितलं जात होतं. पण शिवसेनेच्या कार्यकारिणी बैठकीत असा कुठलाही निर्णय झाला नाही.
शिंदे यांना नेतेपदावरुन का हटवलं नाही?
एकनाथ शिंदे यांनी अद्यापही आपण शिवसेनेत असल्याचं वारंवार सांगितलं आहे. तसंच शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी प्रतारणा केली नाही आणि करणारही नाही. फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत सत्ता नको अशी भूमिका शिंदे गटाची आहे. अशावेळी शिंदे गटाचे काही आमदार अजूनही परततील अशी अपेक्षा शिवसेनेला आहे. तसंच सुरु असलेला सत्तेचा खेळ अजून काही काळ लांबला तर शिंदे यांना परतण्याशिवाय पर्याय उरणार नाही, असाही एक मतप्रवाह आहे. त्यामुळे शिंदे यांच्यावर आजच्या कार्यकारिणीत कारवाई झाली नसल्याचं बोललं जात आहे.
संजय राऊतांचे कारवाईचे संकेत
बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यात येणार का? आणि काय कारवाई करण्यात येणार? असा सवाल विचारण्यात आला. त्यावेळी ही शिवसेना हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आहे आणि राहील. ज्यांनी शिवसेनेसोबत गद्दापरी केली. मग ते कोणत्याही पदावर असोत, त्यांच्यावर कठोर कारवाईचे सर्वाधिकारी उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहेत. लवकरच त्यावर अंमलबजावणी होईल. आज संध्याकाळपर्यंत कारवाई काय ते स्पष्ट होईल, कोण मंत्रिपदावर राहणार, कोण नाही ते दिसेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर कारवाईचे स्पष्ट संकेत दिले आहेत.