शिवसेनेच्या गोटातील आतली बातमी, एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी मंत्री-आमदारांना मोलाच्या सूचना
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अयोध्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी आपल्या आमदार आणि मंत्र्यांना काही खास सूचना दिल्या आहेत. या सूचनांबद्दलची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्याची सुरुवात उद्याच होण्याची शक्यता आहे.
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) येत्या 9 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेचे हजारो कार्यकर्ते आज ट्रेनने अयोध्येच्या दिशेला रवाना झाले आहेत. कार्यकर्त्यांसाठी सरकारकडून ठाणे आणि नाशिक येथून सुटणाऱ्या दोन विशेष ट्रेनची सुविधा करण्यात आलेली. हे कार्यकर्ते उद्या अयोध्येला पोहोचणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री उद्या दुपारनंतर आपल्या सर्व मंत्री, आमदारांसह हवाई मार्गाने लखनऊच्या दिशेला रवाना होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे.
एकनाथ शिंदे यांचं उद्याचं नेमकं वेळापत्रक कसं असेल याबाबतची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे आपल्या पक्षाच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांसोबत एकाच विमानातून प्रवास करुन लखनऊला जाणार आहेत. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्री, आमदार, सचिव, उपनेत्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी सर्वांना उद्या दुपारी साडेतीन वाजता विमानतळावर जमण्याच्या सूचना दिल्या आहेत.
आमदार ‘या’ ठिकाणी जमणार
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशानुसार सर्व मंत्री, आमदार, सचिव उद्या दुपारी साडेतीन वाजता विमानतळावर जमणार आहेत. तिथे मुख्यमंत्री सर्वांना काही महत्त्वाच्या सूचना देणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यासाठी सर्वजण एअरपोर्ट टर्मिनल 2 गेट नंबर एकला जमणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आज ठाणे रेल्वे स्थानकावर दाखल होत अयोध्येला जाणाऱ्या आपल्या कार्यकर्त्यांना निरोप दिला होता. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “प्रभू रामचंद्रांचं दर्शन घेण्यासाठी ठाणे आणि नाशिक येथून प्रत्येकी एक-एक ट्रेन निघाली आहे. जवळपास तीन हजारापेक्षा जास्त शिवसैनिक आणि रामभक्त या ट्रेनने उद्या अयोध्येत पोहोचतील. प्रभू रामचंद्राचं दर्शन ते परवा घेतील. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश बघायला मिळतोय. मी कार्यकर्त्यांना भेटायला स्वत: आलेलो आहे. प्रभू रामचंद्राचं दर्शन कधी होतंय, अशा उत्साहात रामभक्त ट्रेनमधून अयोध्येच्या दिशेला रवाना झाले आहेत”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
“अयोध्या हा आमच्यासाठी अतिशय श्रद्धेचा, भक्तीचा आणि अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे अयोध्या जायचा जेव्हा वेळ येतो तेव्हा कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह बघायला मिळतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील आपण अयोध्येला जाणार असल्याचं विधान केलंय. त्यांच्या वक्तव्याबद्दल एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारलं असता ते आधी मिश्किलपणे हसले. त्यानंतर म्हणाले, “आमच्यामुळे होईना, अनेक लोक रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी ललाईत झाली आहेत. ही चांगली गोष्ट आहे.”