शिवसेनेत पुन्हा भूकंप? 2 खासदार, 5 आमदार शिंदे गटात प्रवेश करणार; विदर्भातील खासदाराचा मोठा दावा
तुमाने यांनी या खासदार आणि आमदारांचं नाव सांगितलं नाही. त्यामुळे सस्पेन्स वाढला आहे. संध्याकाळी शिवसेनेला कोणता धक्का लागणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं असून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
मुंबई: शिवसेना आणि शिंदे गटाचा आज मुंबईत दसरा मेळावा (dussehra rally) सुरू होत आहे. या मेळाव्यातून दोन्ही नेत्यांच्या एकमेकांवर धडाडणार आहेत. तसेच दोन्ही गट शक्तीप्रदर्शन करून आपआपलं वर्चस्व दाखवून देण्याचं प्रयत्न करणार आहेत. ही वर्चस्वाची लढाई सुरू असतानाच शिंदे गटाकडून (shinde camp) शिवसेनेला पुन्हा एकदा सुरुंग लावण्यात येणार आहे. शिवसेनेचे (shivsena) दोन खासदार आणि पाच आमदार आज दसरा रॅलीतच शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. शिंदे गटाच्या एका खासदाराने हा दावा केला आहे. त्यामुळे शिवसेनेत पुन्हा एकदा मोठी फूट पडणार असल्याची चर्चा आहे.
राज्यात मुंबई, ठाण्यासह राज्यातील काही महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. आपलीच शिवसेना खरी आणि आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे वारसदार असल्याचा दावाही दोन्ही गटाकडून केला जात आहे. तसेच आपणच खरी शिवसेना असल्याचं दाखवण्यासाठी दोन्ही गटाकडून संख्याबळ वाढवण्याचा प्रयत्नही केला जात आहे.
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार. शिवसेनेचे दोन खासदार आणि पाच आमदार आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचा मुंबईतील एक आणि मराठवाड्यातील एक खासदार शिवसेनेत येणार आहेत. विदर्भातील शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांनी हा दावा केला आहे.
तुम्हाला आज संध्याकाळी हा धक्का पाहायला मिळणार आहे. लोकं शिंदे गटाच्या विचारधारेवर विश्वास दाखवत आहेत. स्वत:हून फोन करून पक्षप्रवेश करत आहेत, असं कृपाल तुमाने यांनी सांगितलं.
दरम्यान, तुमाने यांनी या खासदार आणि आमदारांचं नाव सांगितलं नाही. त्यामुळे सस्पेन्स वाढला आहे. संध्याकाळी शिवसेनेला कोणता धक्का लागणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं असून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.
शिंदे गटाकडे सध्या 40 आमदार आणि 12 खासदार आहे. तर उद्धव ठाकरे यांच्याकडे 15 आमदार आणि सहाच खासदार उरले आहेत. आता त्यातीलही दोन खासदार आणि पाच आमदार शिंदे गटाच्या गळाला लागणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.