Shiv sena: शिवसेना नव्या पक्षचिन्हाच्या तयारीत? केसरकर म्हणतात, वेळ गेलेली नाही, साहेबांनी सुवर्णमध्य काढावा
हा निर्णय स्वतः उद्धव साहेब घेऊ शकतात. योग्य ते निर्णय घ्यावा, एवढीच आम्ही प्रार्थना करू शकतो. या बाबतीत मी निश्चितपणे आशादायी आहे, असंही केसरकर म्हणाले.
मुंबईः शिवसेना पक्षुप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नव्या पक्षचिन्हाच्या तयारीत आहेत, अशी माहिती पुढे आली आहे. धनुष्यबाण हे पक्षचिन्ह सोडून इतर कोणतंही चिन्ह मिळालं तरी कंबर कसून हे चिन्ह घराघरात पोहोचवण्याची तयारी ठेवा, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना केल्याचं कळतंय. यावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना विनवणी केली आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी उद्धव ठाकरेंनी चर्चा केली तर हे दोन्ही पक्ष एकत्र येतील. काही कारणास्तव दुरावलेल्या पक्षांनी एकत्र आले तर या राजकीय ताणाचा सुवर्णमध्ये साधता येईल, असं आवाहन दीपक केसरकर यांनी केलंय. महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने हा योग्य निर्णय होईल, असंही केसरकर म्हणालेत. आता उद्धव ठाकरे शिंदे गटाच्या या आवाहनाला कितपत प्रतिसाद देतील, हे पहावं लागणार आहे.
काय म्हणाले दीपक केसरकर?
एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी टीव्ही ९ च्या माध्यमातून उद्धव ठाकरेंना आवाहन केलं. फोनवर बोलताना ते म्हणाले, ‘ वेळ गेलेली नाही. वरिष्ठ नेत्यांशी बोलले तर निश्चित मार्ग निघू शकतो. शेवटी वरिष्ठांच्या पातळीवर हे सगळं चालतं. आपल्या पक्षाचे आणि भाजपचे प्रमुख मोदी, अमित शहा, नड्डा आहेत. अनेक वर्षांचे मित्र आहेत. काही कारणामुळे दूर गेले असतील, तर ते जवळ येतील. आम्ही विधीमंडळात एका गटात आलेलो आहोत. महाराष्ट्राच्या विकासासाठी काम सुरु झालं आहे. हे विकास कार्य सुरु असताना सगळ्यांनी एका दिशेने काम करानं हे महत्त्वाचं आहे. हा निर्णय स्वतः उद्धव साहेब घेऊ शकतात. योग्य ते निर्णय घ्यावा, एवढीच आम्ही प्रार्थना करू शकतो. या बाबतीत मी निश्चितपणे आशादायी आहे, असंही केसरकर म्हणाले.
उद्धव ठाकरे धनुष्यबाण सोडणार?
एकनाथ शिंदे गटाला शिवसैनिकांचा वाढता पाठिंबा पाहता, उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षचिन्हावरील आपला ताबा कधीही सुटू शकतो, अशी मानसिकता तयार केली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे नव्या चिन्हाची तयारी ठेवा, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना आवाहन केलंय. शिवसेनेच्या 40 आमदारांच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकारमधून शिवसेनेचं संख्याबळ कमी झालं. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. आता शिवसेनेने 16 अपात्र आमदारांविरोधात केलेल्या कारवाईवर 11 जुलै रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. या सुनावणीत नेमकी शिवसेना कुणाची याबाबतही स्पष्टता होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही निर्णयाची तयारी ठेवा, असे आवाहन शिवसैनिकांना केले आहे, अशी माहिती समोर आली आहे.