Dilip Lande | शिंदे गटातील आमदार दिलीप लांडे नाराज, लांडे म्हणाले, “तर असं काम माझ्याकडून होणार नाही”
दिलीप लांडे यांनी थेट मुंबई उपनगरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आपली नाराजी उघड केली आहे.
मुंबई : शिंदे गटातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या नंतर आता आमदार दिलीप लांडे देखील नाराज असल्याचे समजते. दिलीप लांडे यांनी थेट मुंबई उपनगरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आपली नाराजी उघड केली आहे. मतदारसंघातील विकास काम होत नसल्याचा आरोप दिलीप लांडे यांनी केला आहे.
दिलीप लांडेंनी निधीवाटपावरुन नाराजी व्यक्त केली आहे. मतदारसंघातील विकासकामं होत नसल्याचा आरोप त्यांनी मुंबई उपनगरच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केला.
सरकार बदलले, पण यंत्रणा सुधारली नाही अशी टीका त्यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांना प्रशासकीय अधिकारी खोटी माहिती देत असल्याचा आरोपही दिलीप लांडें यांनी केला आहे.
प्रशासना मधले अधिकारी कामं वेळच्या वेळी करत नाहीत. जिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्यांना शासनाच्या मालकीच्या जागेवरती नाम फलक लावण्याची सूचना करण्यात आली. मात्र, दोन वर्षात साधा फलक लावू शकले नाहीत.
अशा पद्धतीच्या सूचना देऊनही अधिकारी काम करत नसतील तर या डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये येऊन आमदारांनी फक्त नाश्ता करायचा का? आमदाराला नाश्ता देऊन तोंड बंद करायचं तर असलं काम माझ्याकडून असं होणार नाही असे लांडे यांनी स्पष्ट केले.
सत्ताबदलानंतर पहिल्यांदाच पालकमंत्री मंगलप्रभात लोढांच्या अध्यक्षतेखाली पार पडली जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. जिल्हा नियोजन समिती बैठकीला सर्व पक्षीय आमदार-खासदार उपस्थित होते.