Eknath Shinde : शिंदे गटाचे राहूल शेवाळे गटनेते, तर भावना गवळी प्रतोदपदी कायम, लोकसभा अध्यक्षांची मान्यता; आता ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही शिंदे गटाची मागणी मान्य केल्याची माहिती एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्रानंतर आता केंद्रातही शिवसेनेला (Shivsena) मोठा हादरा बसलाय. शिवसेनेचे 12 खासदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. इतकंच नाही तर या खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला (Om Birla) यांची भेटही घेतली. शिवसेनेच्या गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्यात यावी, तसंच मुख्य प्रतोदपदी भावना गवळी (Bhavana Gawali) यांना कायम ठेवण्यात यावं अशी मागणीही त्यांनी केली आहे. महत्वाची बाब म्हणजे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही शिंदे गटाची मागणी मान्य केल्याची माहिती एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. त्यामुळे आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
Lok Sabha Speaker, Om Birla has accepted the demand of Shinde faction of Shiv Sena to change the leader of the House. Now the leader of Shiv Sena in the house will be Rahul Shewale. Whereas, Bhavana Gawali has been retained as the Chief Whip: Sources
— ANI (@ANI) July 19, 2022
राहुल शेवाळेंचा युतीबाबत मोठा गौप्यस्फोट
‘आम्ही राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिला तर त्यांच्यासोबत युती करण्याचा मार्ग मोकळा होईल असं आम्ही सांगितलं. तेव्हा मलाही युती करायची आहे. मी माझ्या परीने युती करायचा खूप प्रयत्न केला असं उद्धव ठाकरे म्हणाले. मोदीसोबत बैठक झाली तेव्हा युतीबाबत मोदींकडे उल्लेख केला, युतीबाबत मोदींसोबत एक तास चर्चा झाली. जूनमध्ये बैठक झाली, जुलैमध्ये अधिवेशन होतं. त्यावेळी भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं. त्यामुळे भाजप नेतृत्व नाराज झालं. एकीकडे युतीचं बोलणं होतंय आणि दुसरीकडे आमदारांवर कारवाई होतेय. त्याबद्दल भाजप श्रेष्ठीत नाराजी पसरली’, असा गौप्यस्फोट शेवाळे यांनी माध्यमांशी बोलताना केलाय.
महिलेच्या आरोपानं शेवाळे वादात
खासदार राहुल शेवाळे यांच्यावर एका महिलेने फसवणुकीचा आरोप केला होता. या महिलेने शेवाळेंवर बलात्काराचा आरोप केला होता. तसेच साकीनाका पोलिसात या महिलेने तक्रार दिली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र, या प्रकरणातून शेवाळे यांना दिलासा मिळाला आहे. या महिलेविरोधातच साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खंडणीवसूल करण्याच्या इराद्याने या महिलेने आरोप केल्याचा दावा शेवाळे यांनी केला आहे.
गवळींवर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप
भावना गवळी यांच्या घरावरही ईडीने छापेमारी केली होती. गवळी यांच्या ट्रस्टमध्ये 17 कोटींच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून तपास करण्यात येत आहे. सामाजिक कार्यकर्ते हरिष सारडा यांनी भावना गवळी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कोऑपरेशन कडून बालाजी सहकारी पार्टिकल बोर्डनं 43.35 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं. हरिष सारडा यांनी भावना गवळी यांनी एनसीडीसीकडून कर्ज घेतलं होतं मात्र, ती कंपनी कधीच सुरु केली नव्हती, असा दावा या तक्रारीत करण्यात आला होता.