नगरविकास सारखं तगडं खातं एकनाथ शिंदेंना मिळणार नाही? उपमुख्यमंत्रीपद आणि ‘हे’ खाते देऊन बोळवण होण्याची शक्यता
शिंदेंना उपमुख्यमंत्री पद आणि महसूल तसेच रस्ते परिवहन खातं मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपकडून शिंदेंची निराशा होईल, असा अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे.
मुंबईः एकनाथ शिंदेंचं (Eknath Shinde) उघड बंड आणि भाजपचा छुपा पाठिंबा याद्वारे महाराष्ट्रात आज सत्तांतर घडून येतंय. शिंदेंच्या बंडामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात गेल्याने उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राजीनामा दिलाय. आता काहीच वेळात भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) राज्यात सत्तास्थापनेचा दावा करतील. आजच देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे शपथही घेतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मागील आठ दिवसांपासून गुवाहटीत असलेल्या एकनाथ शिंदे आणि आमदारांचं लक्ष आता आपल्या हाती काय लागेल, याकडे आहे. ठाकरे सरकारमध्ये नगरविकास सारखं तगडं खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं. आता नव्या मुख्यमंत्र्यांच्या टीममध्ये तेच खातं शिंदेंच्या पदरी पडेल की नाही, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एवढं मोठं नाट्य घडवून आणल्यानंतरही एकनाथ शिंदेंच्या वाट्याला हे खातं येणार नाही..
एकनाथ शिंदेंच्या वाट्याला काय?
महाविकास आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर एकनाथ शिंदे सेने आणि भाजप यांचं सरकार येईल. मात्र सरकारमध्ये महत्त्वाची खाती कुणाला मिळणार, यावर गेल्या काही दिवसांमध्ये महत्त्वाच्या बैठका झाल्या. यात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसमोर नगरविकास खातं मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र भाजपने शिंदेंची ही मागणी फेटाळली आहे. मुख्यमंत्री नेहमीच हे महत्त्वाचं खातं आपल्याकडे ठेवत असतात. पण ठाकरे सरकारमध्ये शिंदेंना हे खातं मिळालं होतं. आता शिंदेंना उपमुख्यमंत्री पद आणि महसूल तसेच रस्ते परिवहन खातं मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपकडून शिंदेंची निराशा होईल, असा अंदाज सूत्रांनी वर्तवला आहे.
In new govt with BJP, Shiv Sena minister Eknath Shinde insisted getting cream portfolio Urban development ministry but BJP flatly refused to concede it. CM always keeps UD but Thackeray had given it to Shinde in his govt. So Shinde likely to get revenue ministry & MSRTC.
— Sudhir Suryawanshi (@ss_suryawanshi) June 30, 2022
शपथविधी संध्याकाळी 7 वाजता
एकनाथ शिंदे यांचं नुकतंच मुंबईत आगमन झालं असून ते देवेंद्र फडणीस यांचे शासकीय निवासस्थान सागर बंगल्यावर पोहोचले आहेत. तेथून हे दोघेही राजभवनात राज्यपालांच्या भेटीसाठी जातील. राज्यपालांसमोर ते सत्तास्थापनेचा दावा करतील. त्यानंतर सत्ता स्थापनेस मंजुरी मिळाल्यानंतर आज संध्याकाळीच 7 वाजता देवेंद्र फडवणीस आणि एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
टीम देवेंद्रमध्ये कोण कोण?
भाजप आणि शिंदेसेनेतील अनेक आमदारांसमोर सध्या एकच प्रश्न आहे. देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रीमंडळात कुणाची वर्णी लागणार? यात फडणवीसांसह चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, आशीष शेलार, प्रवीण दरेकर, चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख, गणेश नाईक, राधाकृष्ण विखे पाटील, संभाजी निलंगेकर, आदींचा समावेश असू शकतो. तर शिंदे सेनेतील एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, दादा भुसे, अब्दुल सत्तार, संजय राठोड, शंभूराज देसाई, बच्चू कडू, तानाजी सावंत यांना कॅबिनेट मंत्री पद मिळू शकते.