Sanjay Raut : एकनाथ शिंदे यांचाच भाजपबरोबर जायला विरोध होता, राऊतांचा गौप्यस्फोट
Sanjay Raut : चुका कुठे होत नाहीत? घरात, कुटुंबात, व्यापार, धंद्यात चुका होतात. राजकारणातही होतात. याचा अर्थ असा नाही की ज्या पक्षाने आपल्याला भरभरून दिलं त्यांना सोडून जावं. आज जे लोक प्रश्न विचारत आहेत. त्यापैकी काही लोकं तर नगरसेवक पदापासून दिल्लीपर्यंत पोहोचले.
मुंबई: महाविकास आघाडीवरून (mahavikas aghadi) शिंदे गटाकडून होत असलेला आरोप हा बहाणा आहे. 2014मध्ये एकनाथ शिंदे यांचाच भाजपबरोबर (bjp) जायला विरोध होता. त्यांची भाषणं पाहा. भाजपच्या मंत्रिमंडळातून आपण बाहेर पडलं पाहिजे ही शिंदेंची भूमिका होती. ती त्यांनी जाहीरपणे मांडली होती, असा गौप्यस्फोट करतानाच भाजप शिवसेनेचे (shivsena) अस्तित्व मिटवून टाकेल. गावागावात शिवसैनिकांवर अत्याचार करतोय. ही भावना आजच्या मुख्यमंत्र्यांची होती. तुम्ही ती ऐकली असेल. घर किंवा पक्ष सोडण्यासाठी विश्वासघात किंवा बेईमानी करण्यासाठी एक बहाणा असतो. त्यात न पडलेलं बरं. अनेक गोष्टी समोर बसून बोलता येतात, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत हे टीव्ही9 मराठीशी बोलत होते. यावेळी त्यांनी शिंदे गटाची पोलखोल करतानाच भाजपलाही फटकारे लगावले.
उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत. महाराष्ट्राचे नेते आहेत. त्यांना आमच्या कायम शुभेच्छा आहेत. गेल्या काही दिवसांपासून ज्या घटना घडामोडी घडवल्या जात आहेत. त्या शिवसेनेवरच नव्हे तर, महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्यासाठी घडवल्या जात आहेत. जोपर्यंत शिवसेना आणि ठाकरे परिवार कमजोर होत नाही, तोपर्यंत काही लोकांचे मनसुबे पूर्ण होणार नाहीत. पण आम्ही सर्वजण उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहू, असं संजय राऊत म्हणाले.
उद्धव ठाकरे तावून सलाखून बाहेर पडतील
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंसमोर आव्हान नाही. शिवसेनेतील प्रत्येक घटक आव्हान झेलून उभा आहे. साधा शिवसैनिक लढतो आहे. पक्षासाठी नेत्यासाठी त्याग करतो आहे. या सर्वांमधून उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व पुन्हा एकदा तावून सलाखून बाहेर पडेल याची खात्री आहे, असं त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं.
स्वार्थ आहे, तोपर्यंत विश्वासघात सुरूच राहील
विश्वासघात जो असतो तो ज्याच्यावर जास्त विश्वास ठेवतो त्याच्याकडून होतो. पण याचा अर्थ लोकांवर विश्वास ठेवणं सोडून देता येत नाही. सहकारी आणि कुटुंबातील घटकांवर विश्वास ठेवावाच लागतो. ज्याच्यावर विश्वास टाकला त्याच्या मनात काय चाललं हे आपल्याला कळत नाही. शेवटी जोपर्यंत स्वार्थ आहे. तोपर्यंत विश्वासघात सुरूच राहील, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
त्याच सरदारांनी घाव घातला
चुका कुठे होत नाहीत? घरात, कुटुंबात, व्यापार, धंद्यात चुका होतात. राजकारणातही होतात. याचा अर्थ असा नाही की ज्या पक्षाने आपल्याला भरभरून दिलं त्यांना सोडून जावं. आज जे लोक प्रश्न विचारत आहेत. त्यापैकी काही लोकं तर नगरसेवक पदापासून दिल्लीपर्यंत पोहोचले. चार चार पाच वेळा मुंबई महापालिकेचे स्टँडिंग कमिटीचे चेअरमन होणं ही साधी गोष्ट नाही. त्यातूनच तुम्हाला बळ मिळालं. त्यातूनच तुमची हाव आणि लालसा वाढली. त्यातूनच तुम्ही घावा घातला आहे. बाळासाहेबांनी माकडांची माणसे केली. माणसांचे सरदार केले. त्याच सरदारांनी शिवसेनेवर घाव घातला, अशी टीका त्यांनी राहुल शेवाळे यांचं नाव न घेता केली.