Maharashtra Politics : भाजपचं वेट अँड वॉच ते थेट फ्लोअर टेस्टची मागणी! सुप्रीम कोर्टाचा निर्णय ते फडणवीसांची दिल्लीवारी, वाचा सविस्तर

भाजपचा एकही नेता या आठ दिवसांत माध्यमांसमोर स्पष्टपण बोलायला तयार नव्हता. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर गेले आणि मुंबईला परतल्यानंतर थेट राजभवन गाठत त्यांनी राज्यपालांना पत्र देत बहुमत चाचणीची मागणी केलीय.

Maharashtra Politics : भाजपचं वेट अँड वॉच ते थेट फ्लोअर टेस्टची मागणी! सुप्रीम कोर्टाचा निर्णय ते फडणवीसांची दिल्लीवारी, वाचा सविस्तर
देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 1:06 AM

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष आता निर्णायक टप्प्यावर आलाय. शिंदेंच्या बंडाळीनंतर शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना कधी परतण्याचं आवाहन करण्यात आलं. तर कधी कारवाईची धमकी देण्यात आली. शिंदे गटातील आमदारांकडूनही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिवसेनेच्या नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. इतकंच नाही तर 16 आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईसाठी शिवसेनेनं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळांकडे पिटिशन दाखल केले. झिरवळांनीही बंडखोर आमदारांना नोटीस बजावली आणि हे प्रकरण सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पोहोचलं. कोर्टाने शिंदे गटाला दिलासा देत 11 जुलैपर्यंत बंडखोर आमदारांना कारवाईपासून संरक्षण दिलं. या सगळ्या घडामोडी घडत असताना राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष मात्र वेट अँड वॉचच्या भूमिकेत होता. भाजपचा एकही नेता या आठ दिवसांत माध्यमांसमोर स्पष्टपण बोलायला तयार नव्हता. मात्र, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मंगळवारी दिल्ली दौऱ्यावर गेले आणि मुंबईला परतल्यानंतर थेट राजभवन गाठत त्यांनी राज्यपालांना पत्र देत बहुमत चाचणीची मागणी केलीय.

मुंबई टू गुवाहाटी व्हाया सूरत

विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागला, महाविकास आघाडीला मोठा झटका देत भाजपनं आपला पाचवा उमेदवारही निवडून आणला. त्याच रात्री शिवसेनेचे मातब्बर नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकावलं आणि त्यांनी थेट सूरत गाठलं. शिंदे यांच्या बंडाळीनं शिवसेनेत भूकंप झाला आणि महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली. दिवसभरातील राजकीय घडामोडीनंतर शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर आमदारांना सूरतवरून एअर लिफ्ट करण्यात आलं आणि आसामच्या गुवाहाटीत ते पोहोचले. महत्वाची बाब म्हणजे या आमदारांना गुवाहाटी नेत असताना भाजप नेते मोहित कंबोज, आमदार रविंद्र चव्हाण आणि संजय कुटे माध्यमांच्या कॅमेरात कैद झाले.

बंडखोरांना चुचकारणे आणि कारवाईचा इशारा

गुवाहाटीत पोहोचल्यानंतर शिंदे यांच्यासह सर्व आमदार हॉटेल रेडिसन्स ब्लू मध्ये मुक्कामी होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कधी या आमदारांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. त्यांना परतण्याचं आवाहन करण्यात आलं. तर कधी ठाकरे पितापुत्र आणि संजय राऊत यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर टीकेची झोड उठवली. इतकंच नाही तर त्यांना कारवाईचा इशाराही देण्यात आला.

भावनिक आवाहन ते सदस्यत्व रद्द करण्यासाठी प्रस्ताव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हवर भावनिक आवाहनही केलं. त्यानंतर त्यांनी वर्षा निवासस्थान सोडत मातोश्रीवर मुक्काम हलवला. इतकंच नाही तर एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरुन काढून अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली. तसंच पक्षाचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी बंडखोर आमदारांना व्हिप बजावत बैठकीला हजर राहण्याचे आदेश दिले. मात्र, बंडखोर आमदारांपैकी एकही आमदार उपस्थित राहिला नाही.

त्यातच कळंब-उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील आणि आमदार नितेश देशमुख हे शिंदे गटातून निसटून परत आले. त्यांनी माध्यमांसमोर येत काही आमदारांना मारहाण झाल्याचा आणि बेशुद्धीचं इंजेक्शन दिल्याचा आरोप केला. मात्र, शिंदे गटाकडून हे सर्व आरोप फेटाळण्यात आले.

विधानसभा उपाध्यक्षांकडून बंडखोर आमदारांना नोटीस

शिवसेनेकडून आधी 12 आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे करण्यात आली. त्यानंतर अजून चार आमदारांविरोधात शिवसेनेनं विधानसभा उपाध्यक्षांकडे पिटिशन दाखल केलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेल्या नरहरी झिरवळांकडून बंडखोर आमदारांना नोटीस बजावण्यात आली आणि दोन दिवसांत उत्तर देण्याचे आदेश त्यांना देण्यात आले.

सुप्रीम कोर्टाचा शिंदे गटाला दिलासा, सरकारला झटका

विधानसभा उपाध्यक्षांच्या आदेशाविरोधात आणि एकनाथ शिंदे यांना गटनेतेपदावरुन हटवल्याच्या मुद्द्यावरुन शिंदे गटानं सुप्रीम कोर्टात दोन याचिका दाखल केल्या. त्यात 39 आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढून देण्याचा दावा अधिकृतपणे शिंदे गटाकडून करण्यात आला. सोमवारी या याचिकेवर सुनावणी पार पडली. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं शिंदे गटाला मोठा दिलासा देत 16 आमदारांवर 11 जुलैपर्यंत कुठलीही कारवाई करता येणार नसल्याचे आदेश दिले. त्यानंतर शिंदे गटातील आमदारांनी मोठा जल्लोष केला.

सत्तानाट्यात भाजपची एन्ट्री, हालचालींना वेग

दुसरीकडे या सत्तासंघर्षात आपण कुठेच नसल्याचा आणि वेट अँड वॉचच्या भूमिकेत आपण आहोत असा दावा करणाऱ्या भाजपनं अधिकृत एन्ट्री घेतली. सोमवारी संध्याकाळी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. महत्वाची बाब म्हणजे बैठकीसाठी सागर बंगल्यावर जातना भाजप नेत्यांच्या चेहऱ्यावर एकप्रकारचं हास्य आणि आनंद पाहायला मिळत होता. इतकंच नाही तर सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीला व्हिक्ट्री साईन दाखवल्यानं चर्चेला उधाण आलं. बैठकीनंतर भाजप राज्यातील सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवून आहे. शिंदे गट स्वत:ला खरी शिवसेना मानत आहे. त्यामुळे शिवसेनेकडून प्रस्ताव आल्यास आम्ही निर्णय घेऊ, सध्या आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं.

सरकार स्थिर, महाविकास आघाडीतील नेत्यांचा दावा

दुसरीकडे या आठवड्याभरात महाविकास आघाडीतील घटकपक्षांमध्ये बैठकांचं सत्र सुरुच होतं. शरद पवार, अजित पवार, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, नाना पटोले, हे सातत्यानं मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत होते. तसंच सरकार टिकणार, फ्लोर टेस्टमध्ये आम्ही बहुमत सिद्ध करु, असा दावाही हे नेते करत होते. त्यातच आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याकडून बंडखोर आमदारांवर टीकेची झोड सुरुच आहे.

फडणवीसांची दिल्लीवारी

सोमवारी सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्यानंतर मंगळवारी सकाळीच देवेंद्र फडणवीस राजधानी दिल्लीत पोहोचले. तिथे त्यांनी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशीही चर्चा केली. या भेटीदरम्यान वकील महेश जेठमलानी फडणवीसांसोबतच होते असंही सांगितलं जात आहे. नड्डा आणि शाह यांची भेट घेतल्यानंतर फडणवीस मंगळवारी संध्याकाळीच मुंबईत दाखल झाले. भाजप नेते सागर बंगल्यावर आधीच उपस्थित होते. तिथे त्यांच्यात पुन्हा चर्चा झाली आणि फडणवीसांच्या नेतृत्वात हे सर्व नेते राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीसाठी राजभवनावर पोहोचले.

उद्धव ठाकरेंचं पत्र, शिंदेंचं प्रत्युत्तर

महत्वाची बाब म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी बंडखोर आमदारांना पत्र लिहिलं. अजूनही वेळ गेलेली नाही. समोर या आणि चर्चा करा. तुमच्या प्रस्तावावर विचार होईल, असं आवाहन केलं. मात्र, ठाकरे यांच्या पत्रानंतर शिंदे यांनी ट्वीट करत आदित्य ठाकरे आणि संजय राऊत करत असलेल्या टीकेवर तीव्र संताप व्यक्त केला. एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं,नाल्याचीघाण,रेडा,कुत्रे,जाहील व मृतदेह म्हणायचे,त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी मविआसरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची,याचा अर्थ काय? असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.

फडणवीस थेट राजभवनावर

सागर बंगल्यावर भाजप नेत्यांची खलबतं झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मोजक्या भाजप नेत्यांसह राजभवनावर दाखल झाले. तिथे त्यांनी राज्यपाल कोश्यारी यांना पत्र दिलं. शिवसेनेचे 39 आमदार बाहेर आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आम्हाला सरकारमध्ये राहायचं नाही अशी त्यांची भूमिका आहे. त्यामुळे हे सरकार अल्पमतात आहे. मुख्यमंत्र्यांजवळ आणि सरकारजवळ बहुमत राहिलेलं नाही. त्यामुळे त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगावं, अशी मागणी त्यांनी राज्यपालांकडे केलीय.

सरकार अल्पमतात, भाजपची फ्लोअर टेस्टची मागणी

भगतसिंह कोश्यारी यांच्या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले की, माननीय राज्यपालांना आज ईमेल द्वारे आणि प्रत्यक्ष अशाप्रकारे भाजपने पत्र दिलेलं आहे. या पत्रात राज्यातील आताच्या परिस्थितीचा उल्लेख केलाय. ज्या बातम्या आम्हाला पाहायला मिळत आहेत. शिवेसनेचे 39 आमदार बाहेर आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत त्यांना राहायचं नाही, असा पवित्रा त्यांनी घेतलाय. अशा परिस्थितीत मुख्यमंत्र्यांजवळ आणि सरकारजवळ बहुमत राहिलेलं नाही. त्यामुळे त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगावं. असं पत्र आम्ही राज्यपालांकडे दिलंय. राज्यपालांना दिलेल्या पत्रात आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या काही निर्णयांचा उल्लेख केलाय. त्याआधारे राज्यपाल उचित निर्णय घेतील आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी योग्य तो निर्देश देतील, अशी आम्हाला आशा आहे.

वेट अँड वॉच ते थेट राजभवन

शिंदे यांच्या बंडाळीनंतर संपूर्ण आठवडाभर आपण कुठेही नसल्याचा दावा भाजप नेत्यांकडून केला जात होता. आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, असं भाजप नेते सांगत होते. महत्वाची बाब म्हणजे या संपूर्ण आठवड्यात देवेंद्र फडणवीस यांनी एकदाही या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली नाही आणि आज त्यांनी थेट सरकारनं बहुमत गमावल्याचा दावा करत फ्लोअर टेस्टची मागणी केली आहे. या काळात फडणवीसांनी दोन ते तीन वेळा दिल्ली तर एकदा गुजरात दौरा केल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, आता काय होणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.