‘जे घरात बसून काम करत होते त्यांनी…’, शिंदेंचा ठाकरेंवर घणाघात
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. विशेष म्हणजे त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचादेखील उल्लेख करत ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला.
मुंबई | 29 नोव्हेंबर 2023 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक घेण्यात आली. या बैठकीत अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना युद्ध पातळीवर मदत करता यावी यासाठी निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आलीय. एकनाथ शिंदे यांनी स्वत: याबाबत माहिती दिली. राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडल्यानंतर त्यांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांनी काल शिंदेंवर निशाणा साधला होता. त्यांच्या टीकेला एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं.
“मी माझं काम करतो. आम्ही सरकार म्हणून नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्याचं काम करतो. हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण आणि संस्कृती विसरले आहेत. त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे त्यांचा एककलमी कार्यक्रम सुरु आहे. तो कार्यक्रम म्हणजे आरोप करणं. खालच्या पातळीवर भाषा वापरणं हे आमच्या संस्कृतीत नाही. महाराष्ट्राची जनता सज्ञ आहे. महाराष्ट्राला एक संस्कृती, परंपरा आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
‘जे घरात बसून काम करत होते त्यांनी…’
“जे घरात बसून काम करत होते, फेसबुक लाईव्ह करुन काम करत होते त्यांनी माझ्यासारख्या मुख्यमंत्री कार्यकर्त्यांना शिकवणं? मला वाटतं महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे. खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीदेखील आपल्या पुस्तकात उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीबद्दल लिहिलेलं आहे. त्यामुळे मी त्यावर जास्त बोलू इच्छित नाही”, अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं.
“हे सरकार काम करणारं आहे. शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहणार आहे. घोषणा करुन फसवणारं नाही. मागच्या सरकारमध्ये, मागच्या मु्ख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणांची पूर्तता आम्ही केली आहे. आम्ही शेतकऱ्यांना पैसे देण्याचं काम केलं. दोन हेक्टरच्या ऐवजी तीन हेक्टरच्या क्षेत्रफळाच्या शेतीला मदत देण्याचा निर्णय घेतला. एनडीआरएफच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेतला. सतत अवकाळी पावासामुळे होणार नुकसान हे नुकसानीत धरण्याचा निर्णय घेतला. एक रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला. त्याचबरोबर पीएम किसान योजनेच्या धरतीवर राज्य शासनाची योजना सुरु केली”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.