Eknath Shinde : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देण्याची चर्चा, शिंदे गटात जल्लोष; एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार?
Eknath Shinde : शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू,
गुवाहाटी: शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी गुवाहाटीतील शिवसेनेच्या (shivsena) बंडखोरांना परत फिरण्याचं आवाहन केलं आहे. समोर या. बसून बोलू. चर्चेतून मार्ग निघेल, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या या आवाहनानंतर गुवाहाटीत बंडखोर आमदारांची चर्चा सुरू झाली आहे. या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यायचा की नाही यावर चर्चा होणार आहे. तसेच शिवसेनेसोबत जायचं तर कोणत्या मुद्द्यावर जायचं यावरही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या शिवाय उद्धव ठाकरे यांनी चर्चा करण्यासाठी येण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे त्यांच्याकडे चर्चेसाठी प्रतिनिधी पाठवायचा की नाही यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या शिवाय देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या या दिल्लीतील भेटीगाठींबाबतही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजीनामा देणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटात (eknath shinde) आनंदाचं वातावरण असून शिंदे हे आता दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राजीनामा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटात आनंदाचं वातावरण आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले आहेत. ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना भेटायला गेले आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदेही दिल्लीला जाण्याची शक्यता आहे. बंडखोरांसोबतची बैठक आवरल्यानंतर शिंदे हे दिल्लीला जातील असं सांगितलं जात आहे.
बैठकीत निर्णय काय?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनानंतर शिंदे गटाची बैठक सुरू झाली आहे. शिंदे समर्थक उद्धव ठाकरेंच्या आवाहनाला प्रतिसाद काय देणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. युतीसाठी उद्धव ठाकरेंनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन शिंदे समर्थक आमदार दीपक केसरकर यांनी काल केले होते. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री म्हणून टिळा लावावा, असं आवाहनही केसरकर यांनी केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे आवाहन केलं. आता शिंदे गट काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उद्धव ठाकरेंचं आवाहन काय?
उद्धव ठाकरे यांनी आज शिंदे समर्थक आमदारांना आज भावनिक आवाहन केलं होतं. उद्धव ठाकरे यांचं हे भावनिक आवाहन असल्याचं सांगितलं जात होतं. आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे. आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. आपण आजही मनाने शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही, माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्या समोर बसा. शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा. यातून निश्चित मार्ग निघेल. आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू. कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका. शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही. समोर आलात बोललात तर मार्ग निघेल. शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे. समोर येऊन बोला आपण मार्ग काढू, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं.