डोळ्यांवर विश्वास ठेवायचा की कानांवर? शिंदे म्हणतात भाजपचा हात नाही, मग कंबोज, कुटे अन् मेघालयचे मुख्यमंत्री काय करत होते?
शिंदेंच्या बंडामागे भाजप नसेल तर मग हे नेते तिथे काय करत होते, असा प्रश्न पडतोय. कधी ना कधी या सर्व नाट्यामागील खरा सूत्रधार समोर येईलच, अशी अपेक्षा महाराष्ट्रातील जनतेला आहे.
मुंबईः मागील चार दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात क्षणा-क्षणाला धक्कादायक घडामोडी घडतायत. आधी गुजरात आणि मग आसाम या भाजप शासित राज्यांमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) वेगळी शिवसेना (Shiv Sena) बांधणी करत आहेत. पुढील काही तासांमध्ये एकनाथ शिंदे गट महाराष्ट्रातील सत्ता (Maharashtra Government) स्थापनेसंदर्भातला आपला पर्याय सर्वांसमोर ठेवतील. मात्र शिंदेंनी पुकारलेलं हे बंड नेमकं कुणाच्या पाठिंब्यानं सुरु आहे, हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या पाठिमागे थेट भाजपचा हात असल्याचा आरोप केलाय. पण एकनाथ शिंदे यांनी हा आरोप फेटाळला आहे. आपल्याला कोणताही भाजप नेता भेटला नाही आणि अद्याप कुणाशीही आमचं बोलणं झालेलं नाही, असं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी नुकतंच टीव्ही9 शी बोलताना सांगितलं. बुधवारी सकाळच्या सुमारास आमच्या प्रतिनिधींशी फोनवर बोलताना एकनाथ शिंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली. पण असं असेल तर सूरतहून व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये भाजप नेते मोहित कंबोज आणि संजय कुटेही दिसले. काल तर मेघालयचे मुख्यमंत्री कॉनराड संगमा हेदेखील गुवाहटीतल्या हॉटेलमध्ये जाताना दिसले. संगमा हे नॅशनल पिपल्स पार्टी प्रमुख असून भाजपचे समर्थक आहेत. शिंदेंच्या बंडामागे भाजप नसेल तर मग हे नेते तिथे काय करत होते, असा प्रश्न पडतोय. कधी ना कधी या सर्व नाट्यामागील खरा सूत्रधार समोर येईलच, अशी अपेक्षा महाराष्ट्रातील जनतेला आहे.
काल म्हणाले आपल्यासोबत महाशक्ती…
गुरुवारी गुवाहटीतील आमदारांसोबतचा एक व्हिडिओ पाठवण्यात आला. त्यात बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे सर्वांना आवाहन करताना दिसून आले. आपल्यासोबत देशातील महाशक्ती असून कुणालाही घाबरण्याचं कारण नाही. आपण सगळे एकत्र आहोत आणि सुखदुःखात एकमेकांसोबत राहू.. असं वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलं.
एकनाथ शिंदेंचं बुधवारचं वक्तव्य-
आज फोनवर बोलताना कोलांटउडी
तर आज शुक्रवारी टीव्ही9 शी फोनवर बोलताना एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या बंडखोरीमागे भाजप आहे, हे मानण्यास नकार दिला. अद्याप आपल्याला कोणताही भाजप नेता भेटला नाही, असं स्पष्टीकरण एकनाथ शिंदे यांनी दिलंय.
’12 आमदारांची नोटीस अवैध’
एकनाथ शिंदेंच्या गटात गेलेल्या 12 आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात शिवसेनेनं पाठवलेली नोटीस बेकायदेशीर असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं. आम्हालाही कायदा माहिती आहे. लोकशाहीत आकड्याला खूप महत्त्व आहे. आम्ही सर्व आमदार एकत्र आहोत. असं निलंबन होऊ शकत नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
गुवाहटीत आज काय?
दरम्यान, आज सकाळी गुवाहटीतील आमदारांची महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. महाराष्ट्रात येऊन शिवसेना पक्षावर दावा करण्यासंबंधी तसेच महाराष्ट्रात भाजपसोबत सत्ता स्थापन करण्यासंबंधी या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल. पुढील काही तासात बैठकीतील तपशील समोर येतील. उद्धव ठाकरे सरकारसमोर एकनाथ शिंदे गट नवे काय प्रस्ताव ठेवेल, हेही काही वेळात समोर येण्याची शक्यता आहे.