महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का, केंद्रीय निवडणूक आयोग अॅक्शनमोडमध्ये
मुंबईत मतदान सुरु असताना उद्धव ठाकरे यांनी घेतलेली पत्रकार परिषद वादात सापडली आहे. "मुंबईत संथगतीने मतदान सुरु असून मतदारांसाठी सोयी-सुविधांचा अभाव आहे", असं उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत म्हणाले होते. त्यांच्या या पत्रकार परिषदेची दखल घेत केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला ठाकरेंवर योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आचारसंहितादरम्यान मतदान सुरु असताना संध्याकाळी पाच वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेवर केंद्रीय निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी 20 मे ला पत्रकार परिषद घेतली होती. या दिवशी मुंबईतील सर्व सहा लोकसभा जागांसह राज्यातील एकूण 13 जागांवर मतदान पार पडलं होतं.
मुंबईत मतदानाच्या दिवशी अनेक मतदारांची नावे हे मतदान यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता. तसेच मुंबईकर मोठ्या संख्येने मतदानासाठी घराबाहेर पडले. पण निवडणूक यंत्रणा कमी पडली. निवडणूक आयोगाकडून मुद्दाम ज्या ठिकाणी ठाकरे गटाला किंवा महाविकास आघाडीला जास्त मतदान होऊ शकतं तिथे मतदानासाठी मुद्दाम जास्त वेळ लावला जातोय, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. निवडणूक आयोगाच्या दिरंगाईमुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या. अखेर कंटाळून अनेक मतदारांनी रांगेतून बाहेर पडत मतदान न करण्याचा निर्णय घेतला, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता.
उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगावरही निशाणा साधला होता. त्यांनी नागरिकांना कोणकोणत्या मतदानकेंद्रांमध्ये मुद्दाम दिरंगाई केली जाते, तसेच तिथले निवडणूक कर्मचारी कोण होते, यांची नावे जवळच्या ठाकरे गटाच्या शाखेत सांगण्याचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. यानंतर आपण त्यांची नावे पत्रकार परिषद घेऊन जाहीर करु, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
सुषमा अंधारे यांचा आशिष शेलार यांना टोला
निवडणूक आयोगाच्या या आदेशावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेते आशिष शेलार यांना टोला लगावला आहे. “आशिष शेलार यांची निवडणूक आयोगात जास्त ओळख दिसत आहे. त्यांनी एक शिफारस आमच्यासाठी देखील करावी. कारण ठाण्यामधील एक व्हिडीओ आम्ही ट्विट केला. आयोगाकडे तक्रार केली. पण आयोगाने दखलच घेतली नाही. बीडमध्ये बुथ कॅपचरिंग, दमदाटी, पैसे वाटप यांचे व्हिडीओ शेअर केले. पण निवडणूक आयोगाने दखल घ्यावी. शेलार यांनी आमच्यावतीने निवडणूक आयोगाला शिफारस करावी, अशी आमची विनंती आहे”, असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.