Gujarat Assembly Election 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे गुजरात निवडणुकीची घोषणा उशिरा?; मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले…
निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करताना अनेक गोष्टींचा बॅलन्स करावा लागतो. हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या विधानसभेच्या मतदानाची मोजणी केली जाते.
नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने (election commission) गुजरातच्या विधानसभा (Gujarat Assembly Election 2022) निवडणुकीची घोषणा केली आहे. ही निवडणूक दोन टप्प्यात होणार आहे. 1 आणि 5 डिसेंबर रोजी गुजरातमध्ये मतदान होईल आणि 8 डिसेंबर रोजी निकाल लागेल. हिमाचल प्रदेशचा निकालही त्याच दिवशी लागणार आहे. हिमाचल प्रदेशच्या निकालासोबतच गुजरातचा निकाल जाहीर करायचा होता तर मग हिमाचलच्या निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या तेव्हाच गुजरातचा (Gujarat) निवडणूक कार्यक्रम का घोषित करण्यात आला नाही? असा सवाल केला जात होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे आणि घोषणांसाठी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला नव्हता का? असा सवालही केला जात होता. या सर्व प्रश्नांवर निवडणूक आयोगाने उत्तर दिलं आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन गुजरातच्या निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली. तसेच गुजरातच्या निवडणुकांचा कार्यक्रम उशिरा का जाहीर करण्यात आला त्याची माहितीही त्यांनी दिली. गुजरातच्या निवडणुकांची घोषणा शेड्यूल नुसारच होत आहे, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं.
शब्दातून बोलण्यापेक्षा आम्ही कृतीतून अधिक बोलतो. मी तुम्हाला कितीही सांगण्याचा प्रयत्न केला तरी आमचे जे निकाल येतात ते योग्य आहे की नाही हे पाहणं महत्त्वाचं आहे. निवडणुकीनंतर आलेल्या निकालात काही कमी असल्याचं आपण म्हटलं तर तो मतदारांचा अपमान ठरेल, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले.
हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांसोबत गुजरातच्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली नव्हती. त्यामुळे काँग्रेसने त्यावर आक्षेप घेतला होता. काँग्रेसने ट्विट करत यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती.
केंद्रीय निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. निवडणूक आयोग निष्पक्ष निवडणुका करत असतो, असं काँग्रेसने म्हटलं होतं. काँग्रेसने या ट्विटसोबत गांधीजींच्या तीन माकडांचा इमोजीही पोस्ट केला होता.
निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करताना अनेक गोष्टींचा बॅलन्स करावा लागतो. हिमाचल प्रदेश आणि गुजरातच्या विधानसभेच्या मतदानाची मोजणी केली जाते. तशी प्रथा आहे. वातावरणाचा प्रश्न असतो. आचार संहिता किती दिवस लागू राहील हा सवाल आहे, असंही त्यांनी सांगितलं.
मोदींमुळे निवडणूक कार्यक्रम उशिरा जाहीर केला का? त्यावर त्यांनी नाही असं उत्तर दिलं. निवडणुकीचे शेड्यूल आमचं पुढे आहे. राज्यात एक दु:खद घटना घडली होती. राज्यात शोक होता. त्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यास थोडा उशीर झाला, असं त्यांनी सांगितलं.