धनुष्यबाणावर आज निर्णयाची शक्यता; …म्हणून चिन्ह शिंदे गटालाच मिळणार, शंभूराज देसाईंचा दावा
सध्या धनुष्यबाण चिन्हावरून शिवसेना आणि शिंदे गट आमने-सामने असल्याचं पहायला मिळत आहे. धनुष्यबाण आम्हालाच मिळेल असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे.
मुंबई: सध्या धनुष्यबाण चिन्हावरून शिवसेना (Shiv sena) आणि शिंदे गट आमने-सामने असल्याचं पहायला मिळत आहे. शिवसेना आणि शिंदे गट दोघांकडून देखील धनुष्यबाण चिन्हावर दावा करण्यात आला आहे. आता याबाबत निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे. धनुष्यबाण चिन्ह कोणाला द्यायचं याचा निर्णय निवडणूक आयोग घेणार आहे. याबाबत आयोगाकडून आजच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वादावर निवडणूक आयोगाकडून लवकरात लवकर निर्णय घेतला जाण्याची शक्याता आहे. शिवसेनेच्या वतीने आज निवडणूक आयोगाकडे पुरावे सादर करण्यात येणार आहेत. तर दुसरीकडे धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळणार असा दावा शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केला आहे.
काय आहे शंभुराज देसाई यांचा दावा?
धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल असा दावा शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांनी केला आहे. नगरसेवक, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य अगदी सरपंचाचे सुद्धा बहुमत शिंदेसाहेबांकडे आहे. त्यामुळे निवडणूक आयोगानं त्यांच्या नियमावालीनुसार बहुमताच्या दृष्टीने विचार केल्यास धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळेल असा दावा शंभुराज देसाई यांनी केला आहे.
शिवसेनेचा निशाणा
तर दुसरीकडे शिवसेनेच्या वतीने शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे. आमदार आणि खासदार मूळ पक्ष होत नाही, शिंदे गट डमी, भाजप सूत्रधार असल्याची टीका अरविंद सावंत यांनी केली आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील शिंदे गटावर निशाणा साधला आहे. शिंदे गटाकडून कवच कुंडल काढण्याचा प्रयत्न होत आहे. कवच कुंडल काढणाऱ्यांना जनता धडा शिकवेल असं पेडणेकर यांनी म्हटलं आहे.