Congress : अखेर प्रतिक्षा संपली, काँग्रेसला मिळणार नवा अध्यक्ष; निवडणुकीचं शेड्यूल पाहा एका क्लिकवर
Congress : अध्यक्षपदाच्या निवडणुकीत केवळ एकच व्यक्ती उभा राहत असेल तर निवडणुकीचा निकाल अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच केली जाईल, असं मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितलं. तर, मिस्त्री यांनी कार्यकारिणीसमोर निवडणुकीचं शेड्यूल ठेवलं. या शेड्यूलवर कोणीही आक्षेप घेतला नाही.
नवी दिल्ली: अखेर काँग्रेसला (Congress) नवा अध्यक्ष मिळणार आहे. काँग्रेसने अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे. तर, मतमोजणी 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. म्हणजे 19 ऑक्टोबर रोजीच काँग्रेसला नवा अध्यक्ष मिळणार आहे. निवडणुकीसाठी (election) 24 सप्टेंबरपासून नामांकन अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. पक्षात नव्या अध्यक्षावरून अनेक शंका आहेत. राहुल गांधी यांनी पक्षाचं अध्यक्षपद स्वीकारावं म्हणून त्यांच्यावर दबाव आणला जाऊ शकतो. मात्र, राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उभं राहण्यास नकार दिला आहे. गांधी कुटुंबाशिवाय इतर अध्यक्ष करण्यास राहुल गांधी (rahul gandhi) यांनीही संमती दर्शवली असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे काँग्रेसला बऱ्याच वर्षानंतर गांधी कुटुंबानंतरचा अध्यक्ष मिळणार आहे.
काँग्रेसच्या वर्किंग कमिटीची आज एक बैठक झाली. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या बैठकीला ऑनलाईन ज्वॉईन झाल्या होत्या. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी हे सुद्धा या बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते. तर उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे, जयराम रमेश आणि केसी वेणुगोपाल यांच्यासह पक्षाचे इतर नेते काँग्रेसच्या मुख्यालयातून पक्षाच्या बैठकीत सामील झाले होते. याशिवाय आनंद शर्मा, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, पी. चिदंबरम, मुकुल वासनिक, मधुसूदन मिस्त्री आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेलही उपस्थित होते.
काँग्रेस नेते काय म्हणाले?
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत केवळ एकच व्यक्ती उभा राहत असेल तर निवडणुकीचा निकाल अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच केली जाईल, असं मधुसूदन मिस्त्री यांनी सांगितलं. तर, मिस्त्री यांनी कार्यकारिणीसमोर निवडणुकीचं शेड्यूल ठेवलं. या शेड्यूलवर कोणीही आक्षेप घेतला नाही, असं जयराम रमेश म्हणाले. तर, निवडणूक आणि भारज जोडो यात्राच्या दरम्यान योग्य समन्वय राहणार असल्याचं केसी वेणुगोपाल यांनी स्पष्ट केलं.
राहुल गांधींवर टीका करत आझादांनी काँग्रेस सोडली
दरम्यान, गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यानंतर ही बैठक होत आहे. आझाद यांनी पक्ष नेतृत्वार टीका करतच काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी सोनिया गांधींना एक पत्र लिहून राजीनामा दिला आहे. या पत्रात त्यांनी राहुल गांधीवर हल्ला चढवला आहे. राहुल गांधी हे अपरिपक्व असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पक्षाचा निर्णय राहुल गांधी यांचे पीए आणि सुरक्षा रक्षकही घेत असल्याचा हल्लाबोल आझाद यांनी केला होता.