Eknath Shinde: उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदेमधल्या समेटाचे मार्ग बंद होतायत? शिंदेंच्या 4 मागण्या ज्या उद्धव ठाकरेंनी आधीच निकालात काढल्या
Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये चार मागण्या केल्या आहेत. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला, असा दावा शिंदे यांनी केला आहे. त्यावर उद्धव ठाकरेंनी आजच्या भाषणात उत्तर दिलं आहे.
मुंबई: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी (eknath shinde) केलेल्या बंडानंतर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी आपलं मौन सोडलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थेट फेसबुक लाईव्ह करून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पक्षातील बंडखोरीवर भाष्य केलं. इतकेच नाही तर मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारीही त्यांनी दाखवली. उद्धव ठाकरे यांनी भावनिक साद घालत बंडखोर आमदारांना परत फिरण्याची अप्रत्यक्षपणे सादच घातली. मात्र, मुख्यमंत्र्यांचं फेसबुक लाईव्ह होत नाही तोच अर्ध्या तासात शिवसेनेचे (shivsena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून मुख्यमंत्र्यांकडे चार मागण्या केल्या. त्यातून त्यांनी उद्धव ठाकरे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्या चारही मागण्या आधीच निकालात काढल्या आहेत. त्यामुळे ठाकरे-शिंदे यांच्यातील समेटाचे मार्गच बंद होत असल्याची जोरदार चर्चा आहे.
१. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला,आणि शिवसैनिक भरडला गेला.
२. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. #HindutvaForever
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022
पहिली मागणी
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये चार मागण्या केल्या आहेत. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला, असा दावा शिंदे यांनी केला आहे. त्यावर उद्धव ठाकरेंनी आजच्या भाषणात उत्तर दिलं आहे. फडणवीस सरकारच्या काळात जे मंत्री होते, जे मिळालं होतं, तेच आताच्या सरकारमध्ये मिळालं आहे, असं उद्धव ठाकरे यांनी सांगून शिंदे यांचा मुद्दा आधीच निकाली काढला आहे. तसेच शिवसेनेच्या वर्धापन दिनी त्यांनी शिवसैनिक आणि आमदारांना संबोधित केलं होतं. त्यावेळी त्यांनी हारजीत ही होतच असते. पुन्हा नव्याने लढू, असं म्हटलं होतं. त्यामुळे घटक पक्षांना फायदा झाला हा शिंदे यांचा युक्तिवादही निकाली निघतो.
दुसरी मागणी
घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे – शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे, असा एक मुद्दा शिंदे यांनी उपस्थित केला आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या लढाऊ वृत्तीवरही वेळोवेळी भाष्य केलं आहे. बाळासाहेबांचा शिवसैनिक हा लढाऊ आहे. तो कोणत्याही संकटाला सामोरे जाणार आहे. लेचापेचा नाही. त्याला सत्तेचा मोह नाही, असं उद्धव ठाकरे यांनी अनेकदा सांगितलेलं आहे.
तिसरी मागणी
पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक आहे, असं शिंदे यांनी म्हटलं आहे. आजच्या भाषणातून उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा निकाली काढला आहे. काही कारणामुळे आपल्याला काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जावं लागलं असल्याचं त्यांनी आज सांगितलं. तर, बंददाराआड झालेल्या चर्चेतील आश्वासनांचे भाजपने पाळली नाहीत. त्यामुळेच आम्हाला युतीतून बाहेर पडावे लागले, हे उद्धव ठाकरे यांनी अनेकदा सांगितलं. शिवसेनेची फसवणूक झाल्यानेच आम्हाला युती तोडावी लागल्याचं उद्धव ठाकरे यांनी अनेकदा सांगितलं आहे. त्यामुळे शिंदे यांचा हा मुद्दाही निकाली निघतो.
चौथी मागणी
महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे, अशी सर्वात मोठी मागणी शिंदे यांनी केली. मात्र ठाकरेंनी ही मागणीही फेटाळून लावली आहे. त्यांनी मुख्यमंत्रीपद आणि पक्षप्रमुखपद सोडायला तयार आहे, असं सांगितलं. आपल्याला सत्तेचा मोह नाही असंही त्यांनी सांगितलं. त्यातून त्यांनी भाजपसोबत जायचं नाही, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. तसेच शरद पवार आणि सोनिया गांधी यांचे गुणगाणही गायलं. त्यामुळे आता माघार नाही, असंच उद्धव ठाकरे यांना सूचवायचं असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे.