नवी दिल्ली: हिटलर सुद्धा निवडणुकीत (election) जिंकून आला होता. तोही निवडणुका जिंकायचा. हिटलर जवळ जर्मनीच्या सर्व संस्थांचा ढाचा होता. मला पूर्ण ढाचा द्या, मग मी सांगतो, असं सांगतानाच भारतातील प्रत्येक संस्था आणि यंत्रणा आज स्वतंत्र तसेच निष्पक्ष नाहीत. भारतातील प्रत्येक यंत्रणा आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (rss) ताब्यात आहे. प्रत्येक संस्थेत संघाचा माणूस आहे. त्यामुळे आपण केवळ एखाद्या राजकीय पक्षाच्या विरोधात लढत नाही आहोत. तर भारताच्या संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चरच्या विरोधात लढत आहोत, असं काँग्रेस नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांनी सांगितलं. मी महागाईवर बोलतो. बेरोजगारीवर बोलतो. मी सत्य बोलतो. त्यामुळे माझ्या पाठी काही एजन्सी लावण्यात आल्या. पण मी खरं बोलायला घाबरत नाही. मी खरं बोलतो. त्यामुळेच लोक माझ्यावर टीका करतात. मी जेवढं सत्य बोलेल तेवढा माझ्यावर हल्ला होईल. पण मी त्याला नाही घाबरत. माझ्यावर जेवढा हल्ला होईल. तेवढं मी शिकत असतो. मला चांगलं वाटतं, असंही राहुल गांधी म्हणाले.
राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन हा हल्लाबोल केला. सरकार महागाई आणि बेरोजगारीला घाबरत आहे. हे लोक जनतेच्या ताकतीला घाबरत आहेत. कारण सत्तेतील लोक खोटं बोलत आहेत. देशात बेरोजगारी, महागाई नाही, देशात चीनची घुसखोरी झालेली नाही, असं हे लोक खोटं सांगत आहेत. हे लोक खोटं बोलतात. केवळ खोटे बोलतात, असा हल्लाही त्यांनी चढवला.
देशात सर्वाधिक बेरोजगारी आहे. पेट्रोल- डिझेल आणि गॅसचे दर वाढतच जात आहेत. पण अर्थमंत्र्यांचं त्याकडे लक्ष नाही. कोणत्याही गावात जा, शहरात जा, लोकच तुम्हाला सांगतील महागाई आहे म्हणून. लोकांना महागाई दिसते. पण सरकारला दिसत नाही, असा हल्लाही त्यांनी चढवला.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या नेतृत्वात आज राष्ट्रपती भवनावर मार्च काढण्यात आला. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसच्या खासदारांनी काळे कपडे घालून या मार्चमध्ये भाग घेतला. या मार्चमध्ये काँग्रेसचे हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. हा मार्च राष्ट्रपती भवनाकडे जात असताना मध्येच अडवला. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन सुरू केलं. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले. अखेर पोलिसांनी राहुल गांधी यांना ताब्यात घेतलं. तर प्रियंका गांधी यांनी फरफटतच पोलीस व्हॅनमध्ये टाकलं. काँग्रेसच्या एकूण 64 खासदारांसह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.