चारित्र्य संपन्न, स्वच्छ प्रतिमा, मराठ्यांचा कैवारी; फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त संजय काकडेंची फेसबुक पोस्ट
राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांनी फडणवीसांना शुभेच्छा देणारी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये मराठ्यांचा कैवारी असा फडणवीसांचा उल्लेख करण्यात आलाय.
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांचा आज वाढदिवस… त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकारणी मंडळी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत करत आहेत. राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांनी फडणवीसांना शुभेच्छा देणारी फेसबुक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये मराठ्यांचा कैवारी असा फडणवीसांचा उल्लेख करण्यात आलाय.
महाराष्ट्राचा विकासपुरुष म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव सर्वांत आघाडीवर
21 व्या शतकातील महाराष्ट्राचा विकासपुरुष म्हणून देवेंद्र फडणवीसांचं नाव सर्वांत आघाडीवर घेतले जाईल. चारित्र्य संपन्न व स्वच्छ प्रतिमा असलेल्या फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची मुहुर्तमेढ 2014 ते 2019 या पाच वर्षाच्या कालखंडात मुख्यमंत्री म्हणून रोवली.
अनेक वर्षे खितपत पडलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न फडणवीसांनी सोडवला
शेती, उद्योग-व्यापारासंबंधी अनेक महत्वपूर्ण योजना राबवितानाच अनेक वर्षे खितपत पडलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न त्यांनी अतिशय कल्पकपणे व कायदेशीरदृष्ट्या सोडवला. महाराष्ट्रामध्ये अनेक मराठा मुख्यमंत्री झाले परंतु, एकानेही मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी मनापासून प्रयत्न केले नाहीत. फडणवीस साहेबांनी मात्र, ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाची अनेक वर्षांची मागणी पूर्ण केली. ते खऱ्या अर्थाने मराठा समाजाचे कैवारी आहेत.
फडणवसांनी मराठा समाजाचा आक्रोश समजून घेतला
देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रुपाने अफाट निर्णय क्षमता असलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला. त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात निर्णयक्षम व विकासाभिमुख सरकार काय असते हे संपूर्ण महाराष्ट्राला समजले. फडणवीस सरकारच्या काळात मराठा समाजाचे अभूतपूर्व असे 57 मोर्चे आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्रात निघाले. कोट्यावधी मराठा समाज रस्त्यावर आला होता. महाराष्ट्रामध्ये भाजपा-शिवसेना महायुतीचे सरकार होते. त्यामुळे ही आंदोलनं, मोर्चे सरकारच्या विरोधातच होती. या आंदोलनाविषयी आकस न बाळगता तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी मराठा समाजाचा आक्रोश समजून घेतला.
फडणवीसांच्या प्रयत्नांवर महाविकास आघाडी सरकारने पाणी फेरलं
मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण करण्यासाठी मराठा समाजाच्या परिस्थितीचे अवलोकन करून माहिती गोळा केली. या माहितीच्या आधारे मराठा समाजात देखील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबांची संख्या मोठी असून त्यांना आरक्षणाची गरज असल्याचे सिद्ध झाले. आणि त्याच आधारे अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीने कायद्याचा आधार घेत फडणवीसांनी मराठा समाजाला सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागास वर्ग (SEBC) कोट्यातून 16 टक्के आरक्षण शिक्षण व नोकरीमध्ये दिले होते. जे उच्च न्यायालयाने अनुक्रमे 12 आणि 13 टक्के केले. मात्र, सध्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे फडणवीसांच्या प्रयत्नांवर पाणी फेरले आणि सर्वोच्च न्यायालयात हे मराठा आरक्षण टिकले नाही.
फडणवीसांच्या दमदार कामगिरीला महाराष्ट्र विसरला नाही, विसरणार नाही
स्वच्छ, पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त सरकार देण्याचा शब्द देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री होताच महाराष्ट्राच्या तमाम जनतेला दिला होता. तो शब्द त्यांनी पाळला आणि महाराष्ट्राला निर्णयक्षम, विकासाभिमुख, पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त सरकार दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातील रयतेचं राज्य आणि शाहु, फुले आंबेडकर यांच्या विचारांवर आधारीत महाराष्ट्राची नवनिर्मिती आणि सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या पाच वर्षांच्या काळात केला. जात, धर्म, पंथ विरहीत केवळ महाराष्ट्राच्या हिताचे, भल्याचे आणि विकासाचे निर्णय घेऊन केलेल्या दमदार कामगिरीला महाराष्ट्र विसरला नाही, विसरणार नाही.
आधुनिक महाराष्ट्राची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या कर्तृत्ववान माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस साहेब यांना वाढदिवसाच्या अनंत कोटी शुभेच्छा, अशा आशयाची फेसबुक पोस्ट संजय काकडे यांनी लिहिली आहे.
(EX MP Sanjay Kakade Greets Devendra fadanvis on Birthday)
हे ही वाचा :
अजितदादांच्या स्वभावाचा ‘तो’ गुण सांगत रोहित पवारांकडून खास वाढदिवसाच्या शुभेच्छा