EXCLUSIVE : तुम्ही निवडणूक लढणार का? आदित्य ठाकरे म्हणतात…
आदित्य ठाकरे हे सोलापूर, उस्मानाबाद अशा जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. दुष्काळग्रस्त भागांची आदित्य ठाकरे पाहणी करत आहेत. ठिकठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात येत आहे.
दिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढण्याबाबत जाहीर संकेत दिले आहेत. ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना आदित्य ठाकरेंनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे अप्रत्यक्ष संकेत दिले आहेत. तुम्ही राजकारणात येणार का? असा सवाल ‘टीव्ही 9 मराठी’च्या प्रतिनिधीने विचारला असता, आदित्य ठाकरेंनी स्पष्ट नकार दिला नाही. शिवाय, त्यांचे उत्तरही अनेक अर्थांनी बोलके होते.
आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“आदित्य ठाकरे सक्रीय राजकारणातून संसदीय राजकारणात येणार का?” असा सवाल ‘टीव्ही 9 मराठी’ने आदित्य ठाकरे यांना विचारला असता, उत्तरात आदित्य ठाकरे म्हणाले, “विधानसभा निवडणूक मी लढवावी का, यावर मी आताच बोलणार नाही. पण माझ्यासारखे तरुण जे माझ्यापेक्षाही जास्त काम करीत आहेत. त्या सर्वांनी त्या त्या क्षेत्रात पुढे यावे शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे.”
त्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’च्या प्रतिनिधीने आदित्य ठाकरेंना पुन्हा विचारले, “आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार का? शिवसेनेप्रमाणे भाजपच्या पक्षश्रेष्ठींचीही इच्छा आहे.” यावर उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, “नक्कीच, शिवसेनेच्या प्रत्येक उमेदवाराचे नाव धनुष्यबाण!!!”
EXCLUSIVE #VIDEO : तुम्ही निवडणूक लढणार का? आदित्य ठाकरे म्हणतात…@ShivSena @AUThackeray pic.twitter.com/TVHiSTnXxl
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 9, 2019
आदित्य ठाकरे हे सोलापूर, उस्मानाबाद अशा जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत. दुष्काळग्रस्त भागांची आदित्य ठाकरे पाहणी करत आहेत. ठिकठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंच्या हस्ते मदतीचे वाटप करण्यात येत आहे. यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे स्थानिक खासदार आणि काही मंत्रीही आहेत.
आदित्य ठाकरे कोण आहेत?
आदित्य ठाकरे हे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. सुरुवातील सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून, नंतर युवासेनेची स्थापना केल्यानंतर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांना करण्यात आले. युवासेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरे अधिक सक्रियपणे राजकारणात उतरले. ठिकठिकाणी सभा घेणं असो वा विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवेळी प्रचारात उतरणं असो, आदित्य ठाकरे अधिक जोमाने काम करु लागले. तरुणांशी संबंधित विषयांवर आवाज उठवत आदित्य ठाकरे यांनी तरुणवर्गाला शिवसेनेशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे.
संबंधित बातम्या :
दोन मतदारसंघांची चाचपणी, मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने आदित्य विधानसभेच्या रिंगणात?
आदित्य ठाकरे शिवसेनेकडून उपमुख्यमंत्रीपदाचा चेहरा?
स्पेशल रिपोर्ट : वांद्रे ते वरळी, आदित्य ठाकरेंसाठी मतदारसंघ कोण सोडणार?