युतीची पंगत! आमदारांसह फडणवीस-उद्धव ठाकरेंचं ताटाला ताट
मुंबई : नाही नाही म्हणता शिवसेना आणि भाजपची युती झाली आणि गेल्या चार वर्षात सातत्याने शिवसेनेने चालवलेला भाजपविरोधही क्षणात मावळला. आता असे काही कार्यक्रम दोन्ही पक्षात होऊ घातले आहेत, ज्यामुळे या दोन्ही पक्षात कधी वाद होता का, असा प्रश्न पडावा. त्याचाच एक भाग म्हणून आज रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ‘वर्षा’ बंगल्यावर होऊ घातलेली […]
मुंबई : नाही नाही म्हणता शिवसेना आणि भाजपची युती झाली आणि गेल्या चार वर्षात सातत्याने शिवसेनेने चालवलेला भाजपविरोधही क्षणात मावळला. आता असे काही कार्यक्रम दोन्ही पक्षात होऊ घातले आहेत, ज्यामुळे या दोन्ही पक्षात कधी वाद होता का, असा प्रश्न पडावा. त्याचाच एक भाग म्हणून आज रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी ‘वर्षा’ बंगल्यावर होऊ घातलेली ‘डिनर डिप्लोमसी’.
शिवसेना आणि भाजपच्या सर्व आमदारांना मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर संध्याकाळी 7.30 वाजता जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या ‘डिनर डिप्लोमसी’ला स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पंगतीलाही अत्यंत महत्त्व आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे उपस्थित शिवसेना-भाजप आमदारांना मार्गदर्शनही करतील.
गेल्या चार ते पाच वर्षांच्या काळात शिवसेना सत्तेत असूनही, सत्तेविरोधात कायम बोलत राहिली. भाजपविरोधात तर क्रमांक एकचा शत्रू असल्यासारखी टीका शिवसेनेचे नेते आणि पक्ष नेतृत्वानेही केली. त्यामुळे दोन्ही पक्षात गेल्या चार ते पाच वर्षात कायम एक तणावाची स्थिती राहिली. दोन वर्षांपूर्वी तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तर शिवाजी पार्कातील जाहीर सभेतून आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यानंतर हळूहळू निवडणुका जवळ येऊ लागल्य आणि शिवसेनेचा भाजपविरोध मावळू लागला.
त्यातच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी पहिल्यांदा फोनवरुन, त्यानंतर प्रत्यक्ष भेटून उद्धव ठाकरेंशी चर्चा केली आणि शिवसेनेच्या विरोधाच्या तलवारी अचानक म्यान झाल्या. शिवसेनेने आपला विरोध गुंडाळून ठेवला आणि भाजपसोबत युती करण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शाह मुंबईत आले आणि उद्धव ठाकरेंसोबत पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणाही केली.
दुसरीकडे, गेल्या चार वर्षांपासून भाजप-सेना वाद सुरु असल्याने, स्थानिक कार्यकर्ते मात्र संभ्रमात आहेत. त्यातच जालना मतदारसंघात ज्याप्रकारे अर्जुन खोतकरांची नाराजी लपून राहिली नाही, त्याप्रमाणे अनेक ठिकाणी खदखद आहे. मात्र, त्यातून मार्ग काढण्यासाठी आणि मनं जुळवण्यासाठी आता शिवसेना-भाजपची ‘डिनर डिप्लोमसी’ किती परिणामकारक ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.