मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात तासातासाला वेगाने घडामोडी घडत आहेत. अनाकलनीय अशा राजकीय घटना घडत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) आणि एकनाथ शिंदे (eknath shinde) यांची पत्रकार परिषद घेतली. त्यात शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात येत असल्याची घोषणा फडणवीस यांनी करून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्यानंतर मी शिंदे यांच्या मंत्रिमंडळात नसेल असं फडणवीस यांनी जाहीर करून दुसरा धक्का दिला. त्यामुळे फडणवीस प्रदेशाध्यक्ष होणार असल्याच्या चर्चा रंगल्या. मात्र, या चर्चा सुरू असतानाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (jp nadda) यांनी ट्विट करून व्हिडिओच्या माध्यमातून फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची विनंती केली. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटलं. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच फडणवीस मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचं जेपी नड्डा यांनी जाहीर केलं. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. त्यामुळे फडणवीस आणि नड्डा यांच्यात विसंवाद असल्याचं दिसून आलं आहे.
देवेंद्र फडणवीस यांना राज्याचं मुख्यमंत्रीपद हवं होतं. पण नेतृत्वाने त्याला नकार दिला. त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद घेण्यास सांगण्यात आलं. मात्र, फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदासाठी इच्छूक नव्हते. मुख्यमंत्रीपद उपभोगल्यानंतर उपमुख्यमंत्रीपद घेण्यास ते इच्छूक नव्हते. शिवाय शिंदेंनी त्यांच्या हाताखाली काम केलेले असताना आता शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणं फडणवीस यांना पटणारं नव्हतं. त्यामुळे त्यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला. शिंदे यांना मुख्यमंत्री करून फडणवीस यांनी त्याग केल्याचं चित्रं निर्माण झालं असतं, असं सूत्रांनी सांगितंल. शिंदे यांची ही त्यागशील प्रतिमा निर्माण होऊ नये म्हणूनच त्यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आल्याचं सांगण्यात आलं.
शिंदे यांना मुख्यमंत्रीपद आणि फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं. पण फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपद देण्याबाबतचा निर्णय घेण्याआधी भाजपने चर्चा केली नाही का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. मी सरकारमध्ये सहभागी होणार नसल्याचं फडणवीस यांनी जाहीर केलं. त्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचं जाहीर आवाहन करावं लागलं. त्यानंतर फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असल्याचंही पक्षाध्यक्षाने जाहीर केलं. यावरून भाजपमध्ये फडणवीस यांच्या पदावरून विसंवाद असल्याचं दिसून आलं आहे. सूत्रांच्या मते फडणवीसांशी याबाबत चर्चा झाली होती. त्यासाठी फडणवीस तीनवेळा दिल्लीत जाऊन आले होते. त्यावेळी त्यांना उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती. पण त्यांनी नकार दिला. त्यामुळे थेट पक्षाध्यक्षांना निर्णय जाहीर करावा लागल्याचं सांगितलं जातं. फडणवीस आणि मोदी यांच्यात फोनवरून चर्चा झाल्यावर फडणवीस यांनी त्यास होकार दिला असल्याचंही सांगितलं आहे.
फडणवीस या सरकारमध्ये नसतील तर हे सरकार स्थिर राहणार नाही, अशी भीती भाजप श्रेष्ठींना वाटत असावी. त्यामुळे फडणवीस यांना सरकारमध्ये सहभागी करून घेऊन सरकार स्थिर ठेवावं. पक्षही स्थिर राहावा ही या मागची रणनीती असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान, शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यात भाजपचा हात असल्याचं चित्रं निर्माण झालं होतं. या बंडामागे आमचा हात नसल्याचं भाजपकडूनही वारंवार सांगितलं गेलं. त्यामुळे शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देण्याचं ठरलं. हा निर्णय दिल्लीचा होता. त्यामुळे फडणवीस यांना फारशी ढवळाढवळ करता आली नाही. पहिल्यांदाच फडणवीस यांचं पक्षश्रेष्ठींसमोर काहीच चाललं नसल्याचं सांगितलं जातं.
राज्यपालांना भेटल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शिंदे हे मुख्यमंत्री होणार असल्याचं फडणवीसांनी जाहीर केलं. या सरकारमध्ये आपण नसू असंही त्यांनी जाहीर केलं. त्यामुळे फडणवीस यांची प्रतिमा त्यागशील अशी निर्माण झाली. शिंदे मुख्यमंत्री होण्याचं सर्व क्रेडिट फडणवीसांना गेलं. पक्षाला त्याचं क्रेडिट गेलं नाही.