सत्तेच्या ‘नगर पॅटर्न’वर अखेर शरद पवार बोलले!
अहमदनगर : अहमदनगर महापालिकेच्या महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपच्या मदतीने भाजपने आपला महापौर निवडून आणला. यावरुन काँग्रेससह सर्वांनीच राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तातडीने नगरमधील नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस पाठवली. मात्र, या घटनेवर शरद पवार काय म्हणतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर शरद पवारांनी मौन सोडलं आहे. शरद पवार काय […]
अहमदनगर : अहमदनगर महापालिकेच्या महापौर निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि बसपच्या मदतीने भाजपने आपला महापौर निवडून आणला. यावरुन काँग्रेससह सर्वांनीच राष्ट्रवादीवर टीकेची झोड उठवली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तातडीने नगरमधील नगरसेवकांना कारणे दाखवा नोटीस पाठवली. मात्र, या घटनेवर शरद पवार काय म्हणतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर शरद पवारांनी मौन सोडलं आहे.
शरद पवार काय म्हणाले?
“अहमदनगरच्या महापौरपदाच्या निवडणुकीसंदर्भातल्या घडामोडींबाबत मी माझ्या पक्षाच्या राज्याच्या अध्यक्षांशी चर्चा केली. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या की अशा प्रकारची आघाडी आपण करायची नाही. भाजपाबरोबर जायचं नाही. त्यानंतर नगरमधली मंडळी व इथले आमदार मला भेटायला आले. त्यांचं म्हणणं मी ऐकून घेतलं व या निवडणुकीमध्ये आपण बीजेपीबरोबर जायचं नाही हा निर्णय मी त्यांना सांगितला. मी सांगितल्यानंतर आणखी कुणी सांगायची गरज होती असं वाटत नाही. तरीही मी सांगितल्यावरही हा निर्णय घेण्यात आला.” असे शरद पवार म्हणाले,
तसेच, आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी या लोकांना नोटीसा देऊन स्पष्टीकरण मागवले आहे. माहिती आल्यावर 4 किंवा 5 जानेवारीला बैठकीमध्ये स्वच्छ निर्णय होईल, असा इशारा शरद पवार यांनी दिला असून, आदेशानंतरही विसंगत निर्णय स्वीकारार्ह नाही. त्याची नोंद पक्षाने गांभीर्याने घेतली आहे व कारवाई गांभीर्यानेच केली जाईल, असेही पवारांनी यावेळी सांगितले.
शरद पवार हे अहमदनगरमध्येच एका कार्यक्रमासाठी आले असताना, त्यांनी यासंदर्भात सांगितले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप हे देखील उपस्थित होते. मात्र पवारांनी आपल्या भाषणत संग्राम जगताप यांचा नामोल्लेख टाळल्याने पवार 4 तारखेला नेमकी काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे.
महापौर निवडणुकीत नेमकं काय झालं?
अहमदनगर महानगरपालिका महापौर निवडणुकीत भाजप आमदार शिवाजी कर्डिलेच किंगमेकर ठरले आहेत. कारण 14 जागा मिळवून तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपने राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती करत, महापौरपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. महापालिका निवडणुकीत शिवसेना 24 जागांसह पहिल्या क्रमांकावर होती, मात्र भाजपने स्वत:चे 14 अधिक दुसऱ्याक्रमांकावरील राष्ट्रवादीचे 18 तसंच बसपाचे 4 आणि अपक्ष 1 असा मिळून 37 जागांचं बळ भाजपच्या पदरात पडलं. त्यामुळे भाजपचे बाबासाहेब वाकळे महापौरपदी विजयी झाले.
अहमदनगर संदर्भातील शरद पवारांचे ट्वीट :