Vidhan Parishad Election 2022 : असं पहिल्यांदाच घडतंय, एकाच मतदारसंघात तीन आमदार, पुत्रप्रेमाचा असाही साईड इफेक्ट
Vidhan Parishad Election 2022 : शिवसेनेकडून सचिन अहिर आणि शिवसेनेचे नंदूरबार जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे.
मुंबई: एकाच घरात दोघे दोघे आमदार असण्याच्या किंवा एकाच घरात खासदार आणि आमदारही असण्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या आहेत. पण एकाच मतदारसंघात तीनतीन आमदार असण्याची मुंबईतली तरी कदाचित ही पहिलीच वेळ असणार आहे. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (aaditya thackeray) हे वरळी विधानसभा मतदारसंघातील आमदार आहेत. याच मतदारसंघात राहणाऱ्या शिवसेनेचे नेते सुनील शिंदे यांना शिवसेनेने आधीच विधान परिषदेवर (Vidhan Parishad Election) पाठवलं आहे. तर राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या सचिन अहिर (sachin ahir) यांनाही आता विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे अहिर हे वरळीतच राहतात आणि त्यांनी यापूर्वी विधानसभेत वरळीचं प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुत्रप्रेमापोटी एकाच मतदारसंघात तीन तीन आमदार तर दिले नाही ना? अशी चर्चा आता रंगली आहे.
शिवसेनेकडून सचिन अहिर आणि शिवसेनेचे नंदूरबार जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांनी विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरला आहे. या दोन्ही उमेदवारांचा विजय निश्चित मानला जात आहे. त्यामुळे वरळी मतदारसंघात तीन तीन आमदार असणार आहेत. त्यामुळे वरळीचा कायापालट होणार का? अशी चर्चा आता सुरू आहे.
तीन आमदार का?
2019च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे उभे राहणार होते. ठाकरे घराण्यातील व्यक्ती पहिल्यांदाच विधानसभेची निवडणूक लढवत असल्याने त्यांच्यासाठी सेफ मतदारसंघ शोधण्यात येत होता. शेवटी वरळीतून लढण्याचं ठरलं. त्यावेळी शिवसेनेचे नेते सुनील शिंदे हे वरळीचे विद्यमान आमदार होते. शिंदे यांनी 2014च्या निवडणुकीत त्यावेळचे विद्यमान आमदार सचिन अहिर यांचा पराभव करून विजय मिळवला होता. अहिर हे त्यावेळी राष्ट्रवादीत होते. शिंदे यांनी अहिर यांचा पराभव केल्यानंतर काही महिन्यानंतर अहिर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी अहिर यांना काही कमिटमेंट करण्यात आली होती. मात्र, आदित्य ठाकरे वरळीतून लढणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर सर्वच गणितं बदलली. सुनील शिंदे यांनी आदित्य यांच्यासाठी आमदारकी सोडली. नंतर झालेल्या निवडणुकीत आदित्य ठाकरे विजयी झाले. त्यानंतर विधान परिषदेच्या काही जागा रिक्त झाल्या होत्या. त्यामुळे शिवसेनेने सुनील शिंदे यांच्या त्यागाची कदर करत त्यांना विधान परिषदेवर पाठवलं. आता विधान परिषदेच्या आणखी दोन जागा रिक्त झाल्याने शिवसेनेने अहिर यांना विधान परिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एकाच मतदारसंघात तीन आमदार दिसणार आहेत.
अहिर आणि शिंदे यांनी यापूर्वी वरळीचं प्रतिनिधीत्व केलं आहे. दोघेही वरळीतच राहतात. तर, आदित्य ठाकरे हे वांद्रे येथे राहत असले तरी ते वरळीचे विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे एखाद्या मतदारसंघात तीन आमदार असण्याची ही बहुदा पहिलीच वेळ असणार आहे.
अमरावतीत दोन खासदार
अमरावतीत नवनीत राणा या खासदार आहेत. राष्ट्रवादीच्या पाठबळामुळे त्या अमरावतीतून निवडून आल्या आहेत. आता त्या भाजपच्या बाजूने आहेत. मात्र, भाजपने अमरावतीतील भाजपचे नेते अनिल बोंडे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अमरावतीला दोन दोन खासदार मिळणार आहेत. याशिवाय श्रीकांत भारतीय हे अमरावतीचेच आहेत. त्यांनाही भाजपने विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अमरावतीला एक एक्स्ट्रा आमदार मिळणार आहे.