शिवसेनाप्रमुखांच्या नावाचा बाजार मांडू नका; उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्र्यांना टोला
तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाशी आम्ही सहमत नाही, असं सांगतानाच आम्हाला सावरकरांबद्दल नितांत आदर आणि प्रेम आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृती दिन आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कालच बाळासाहेबांच्या स्मृती स्थळावर येऊन त्यांना अभिवादन केलं. आम्हीच बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. त्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र, मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. काही लोकांना शिवसेनाप्रमुख कोण हे बाळासाहेबांच्या नंतर समजायला दहा वर्ष लागली, असा चिमटा काढतानाच शिवसेनाप्रमुखांच्या नावाने बाजार मांडू नका, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
बाळासाहेबांचा आजचा स्मृतीदिन मला वेगळा वाटतो. त्याला कारण आहे. कारण काही जणांना दहा वर्ष लागली शिवसेनाप्रमुखांनंतर शिवसेना प्रमुख कोण हे समजायला. अनेक शिवसेना प्रेमी आहेत. शिवसेना प्रमुख प्रेमी आहेत. त्यांनी सुद्धा त्यांचं प्रेम आणि भावना व्यक्त करायला हरकत नाहीये. पण ते व्यक्त करताना त्याचा बाजार होऊ नये ही भावना आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
बाजारूपणा कशातही दिसता कामा नये. कारण विचार व्यक्त करायला कृती असावी लागते. कृतीतूनही विचार व्यक्त होतात. कृती नसेल तर तो विचार विचार राहत नाही. तो बाजार राहतो. म्हणून शिवसेना प्रमुखांच्या नावाचा बाजार कुणी मांडू नये. त्यांच्या भावना, श्रद्धा, प्रेम समजू शकतो. पण तुम्ही साजेसं काम करा, असा टोला त्यांनी लगावला.
शिवसेना प्रमुखांचा आज दहावा स्मृती दिन आहे. ते केवळ शिवसेना प्रमुख नव्हते. त्यांच्यात अनेक पैलू होते. त्याचा अनुभव घडवणारा जिवंत अनुभव स्मारकात पाहता येणार आहे. शिवसेनाप्रमुख म्हटलं तर संघर्ष आलाच. या संघर्षाचं अर्क चित्रं या प्रदर्शनात पाहायला मिळत आहे, असंही त्यांनी सांगितलं.
भाजपला संपूर्ण देशाचा ताबा हवा आहे. तिथे या स्मारकाचं काय? त्यांना सर्वच आपल्या बुडाखाली घ्यायचं आहे, अशी खोचक टीकाही त्यांनी केली.
तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या विधानाशी आम्ही सहमत नाही, असं सांगतानाच आम्हाला सावरकरांबद्दल नितांत आदर आणि प्रेम आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
पंतप्रधानांना भारतरत्न परुस्कार देण्याचे सर्वाधिकार असतात. मग तुम्ही सत्तेत येऊन 8 वर्ष झाली. सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? असा सवाल त्यांनी केला.
ज्यांच्या मातृसंस्थेचं स्वातंत्र्याच्या चळवळीत सहभाग नव्हता. जे कधी हिंदूंना वाचवण्यासाठी निजामांविरोधात लढले नाहीत. त्यांनी आम्हाला सावरकरांबद्दल सांगू नये, अशी खरमरीत टीकाही त्यांनी केली.