Ashok Chavan | अशोक चव्हाणांची भाजपा प्रवेशासाठी काय अट? देवेंद्र फडणवीस म्हणाले….
Ashok Chavan | प्राथमिक सदस्यत्वाच्या फॉर्मवर सही करून अशोक चव्हाण यांना पक्षात रितसर प्रवेश देण्यात आला. मराठवाड्यात खासकरुन नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांची ताकद होती. आता भाजपाला त्या भागात बळ मिळणार आहे. अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशावेळी सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली.
मुंबई : राज्यातील काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी आज काँग्रेसची अनेक वर्षांची साथ सोडून भाजपामध्ये प्रवेश केला. मुंबई नरिमन पॉइंट येथील भाजपा कार्यालयात हा पक्षप्रवेश झाला. अशोक चव्हाण यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली आहे. मराठवाड्यात खासकरुन नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण यांची ताकद होती. आता भाजपाला त्या भागात बळ मिळणार आहे. अशोक चव्हाण यांच्या पक्षप्रवेशावेळी सर्वप्रथम देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका मांडली. “आज आमच्या सगळ्यांकरता आनंदाचा दिवस आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेतृत्व, अनेक वर्ष महाराष्ट्र विधानसभा, देशाची लोकसभा ज्यांनी गाजवली, विविध मंत्रीपद ज्यांनी भूषवली, दोनवेळा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कारकीर्द पाहायला मिळाली, असे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण आज भाजपात प्रवेश करत आहेत” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
प्राथमिक सदस्यत्वाच्या फॉर्मवर सही करून अशोक चव्हाण यांना पक्षात रितसर प्रवेश देण्यात आला. “भाजपामध्ये अशोक चव्हाण यांच स्वागत करतो. त्यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याच्या प्रवेशामुळे महाराष्ट्रात भाजपा, महायुतीची शक्ती वाढलीय. याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाहीय” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
म्हणून अशोक चव्हाण यांनी प्रवेश केला
“देशभरात मोदी यांनी ज्या प्रकारे भारताला विकसित करण्याचं स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याचं सुरू केलं. जो बदल देशभरात दिसू लागला आहे. त्यामुळे देशभरातील नेत्यांना आपणही मुख्यप्रवाहात काम करावं, मोदीजींसारख्या नेतृत्वासोबत काम करावं, मोदींचा प्रयत्न आहे, त्यात आपणही वाटा उचलावा असा विचार नेत्यांमध्ये आला. त्यात प्रमुख नेतृत्व म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडे पाहू शकतो” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हजारो कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम होणार
“अशोक चव्हाण यांनी बिनशर्त प्रवेश केला. विकासाच्या मुख्यधारेत योगदान देण्याची मला संधी द्या. मला पदाची अपेक्षा नाही, लालसा नाही असं अशोक चव्हाण म्हणाले” असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. “आम्हाला आनंद आहे, खरं म्हणजे त्यांचा प्रवेश झाला. राजूरकर यांचा प्रवेश झाला. लवकरच हजारो कार्यकर्त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करू. मराठवाडा आणि महाराष्ट्रात आम्हाला बळ मिळेल. त्याचा आम्हाला फायदा होईल. मी त्यांचं स्वागत करतो” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.