Uddhav Thackeray | पाचवेळा आमदार राहिलेल्या नेत्याने ठाकरे गट सोडला, का अशी वेळ आली?
Uddhav Thackeray | नाशिकच्या राजकारणात उद्धव ठाकरे गटाला झटका बसला आहे. पाचवेळा आमदार राहिलेल्या नेत्याने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. "माझी वकिली करणारेही गप्प आहेत. त्यापेक्षा आपण थांबून घेणं महत्वाच वाटतं. म्हणून मी माझा शिवसैनिक पदाचा राजीनामा देत आहे" असं त्याने म्हटलय.
नाशिक (निवृत्ती बाबर) : नाशिक जिल्ह्याच्या राजकारणात ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेकडून पाचवेळा आमदार राहिलेल्या बबनराव घोलप यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली आहे. बबनराव घोलप यांनी शिवसैनिक पदाचा राजीनामा दिलाय. “मी आज माझ्या शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्व पदाचा राजीनामा देत आहे. कारण आजपर्यंत शिवसैनिक म्हणून मी निष्ठेने काम केले आहे. मला पक्षाने जे जे सांगितलं, ते प्रामाणिकपणे केलं आहे” असं बबनराव घोलाप यांनी म्हटलय. “अचानकपणे शिर्डी लोकसभा संपर्क प्रमुख पदावरुन मला काढून अपमानित करण्यात आलं. मी जे निष्क्रीय पदाधिकारी काढले होते, नवीन पदाधीकारी नेमले होते. त्यांना ही बदलण्यात आले हे कितपत योग्य आहे” असं बबनराव घोलप यांनी म्हटलं आहे.
“सर्वात महत्वाच म्हणजे एकनिष्ठ शिवसैनिक अमर कतारीला कुठच ठेवल नाही. विशेष म्हणजे ज्या सहा विधानसभा संर्पक प्रमुखांनी लेखी कळवले होते, की हे जुने पदाधिकारी कसे बिनकामाचे विकाऊ आहेत, ते लक्षात येऊन सुध्दा त्यांना परत घेऊन पदं दिली, हे सर्व पाहून मी अचंबित आहे. नेमकं माझ काय चुकलं ते समजल नाही. मी याबाबत दादही मागितली पण काहीच उत्तर मिळाल नाही” असं बबनराव घोलप यांनी म्हटलय.
‘त्यापेक्षा आपण थांबून घेणं महत्वाच वाटतं’
“माझी वकिली करणारेही गप्प आहेत. त्यापेक्षा आपण थांबून घेणं महत्वाच वाटतं. म्हणून मी माझा शिवसैनिक पदाचा राजीनामा देत आहे” उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगर, शिर्डी लोकसभा मतदार संघाचा दौरा करून परत आल्यानंतर घोलप यांनी राजीनामा दिला आहे. भाजपचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना ठाकरे गटात प्रवेश देण्यात आला. त्यावरुन बबनराव घोलप नाराज होते. बबनराव घोलप हे शिर्डी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. पण आता ही जागा भाऊसाहेब वाकचौरे यांना मिळू शकते.