वडिलांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार?; अमोल कीर्तिकर यांची फेसबुक पोस्ट नेमकी काय?

| Updated on: Nov 12, 2022 | 1:28 PM

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम आदी मतदार संघ येतात.

वडिलांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार?; अमोल कीर्तिकर यांची फेसबुक पोस्ट नेमकी काय?
वडिलांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावणार?; अमोल कीर्तिकर यांची फेसबुक पोस्ट नेमकी काय?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. कीर्तिकर यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिल्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मात्र, पक्षात अधिक पडझड होऊ नये म्हणून ठाकरे गटाने कंबर कसली आहे. ठाकरे गटाने आज गोरेगावात तातडीने एका बैठकीचं आयोजन केलं होतं. ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई यांनी या बैठकीला संबोधित केलं. विशेष म्हणजे यावेळी गजानन कीर्तिकर यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकरही या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत गोरेगाव मतदारसंघ राखण्याची रणनीती ठरली आहे. त्यामुळे वडिलांच्या मतदारसंघात मुलगा सुरुंग लावणार का? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

अमोल कीर्तिकर यांनी आज झालेल्या या बैठकीची माहिती स्वत:ची दिली आहे. अमोल कीर्तिकर यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करून ही माहिती दिली आहे.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली गोरेगाव विधानसभेतील पदाधिकाऱ्यांची बैठक आज संपन्न झाली. यावेळी शिवसेनेच्या भविष्यातील वाटचालीसंदर्भात देसाईसाहेबांनी मार्गदर्शन केले. येत्या महापालिका निवडणूकीत पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या मार्गदर्शनाखाली गोरेगाव विधानसभेतील सर्व प्रभागातून शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार केला, अशी पोस्ट अमोल कीर्तिकर यांनी फेसबुकवर लिहिली आहे.

अमोल कीर्तिकर यांनी ही पोस्ट शेअर करताना सोबत या बैठकीचे फोटोही शेअर केले आहेत. या फोटोत ते माजी मंत्री सुभाष देसाई आणि माजी नगरसेवक समीर देसाई यांच्यासोबत बसलेले दिसत आहेत. सोबत अन्य पदाधिकारीही आहेत.

यावेळी त्यांनी व्हिक्ट्रीची साईन दाखवली आहे. त्यामुळे मुलगा वडिलांच्या मतदारसंघाला खिंडार पाडणार का? अशी चर्चा या निमित्ताने रंगली आहे.

गजानन कीर्तिकर हे मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहे. या मतदारसंघातून एकेकाळी काँग्रेसचे दिवंगत नेते सुनील दत्त, भाजपचे दिवंगत नेते राम जेठमलानी, शिवसेनेचे दिवंगत नेते मधुकर सरपोतदार, काँग्रेस नेत्या प्रिया दत्त आणि काँग्रेसचे दिवंगत नेते गुरुदास कामत विजयी झाले आहेत.

मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पूर्व आणि अंधेरी पश्चिम आदी मतदार संघ येतात. या लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे तीन आणि भाजपचे तीन आमदार आहेत.

तर गोरेगाव विधानसभा मतदारसंघात भाजपच्या विद्या ठाकूर या आमदार आहेत. त्यामुळे आता कीर्तिकरांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने या मतदारसंघात बांधणी करण्यासाठी ठाकरे गटाने कंबर कसली आहे.