Ghansawangi Vidhan Sabha 2024 : होम पीचवर घनसावंगीमध्ये मनोज जरांगे पाटीला महायुतीचा उमेदवार पाडू शकतात का?

Ghansawangi Vidhan Sabha 2024 : मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाची सुरुवात अंतरावली-सराटी येथून झाली. हे अंतरवाली-सराटी गाव जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघात येतं. मागच्या वर्षभरात अनेक मोठ्या नेत्यांचे पाय या अंतरवाली-सराटी गावाला लागले. आता मनोज जरांगे पाटील त्यांच्या होम पीचवर म्हणजे घनसावंगीमध्ये महायुतीचा उमेदवार पाडू शकतात का? याची चर्चा सुरु आहे.

Ghansawangi Vidhan Sabha 2024 : होम पीचवर घनसावंगीमध्ये मनोज जरांगे पाटीला महायुतीचा उमेदवार पाडू शकतात का?
MANOJ JARANGE PATIL
Follow us
| Updated on: Nov 11, 2024 | 11:56 AM

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत काही मतदारसंघातील लढतींकडे सगळ्या राज्याच लक्ष लागलं आहे. उदहारणार्थ माहीम, वरळी, बारामती. कारण, या मतदारसंघांमध्ये राज्यातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या तीन विधानसभा मतदारसंघाव्यतिरिक्त घनसावंगी विधानसभा मतदारसंघही चर्चेत आहे. मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात घनसावंगी विधानसभा मतदारसंघ येतो. घनसावंगी चर्चेत येण्यामागचं कारण आहे, अंतरवाली-सराटी गाव. मागच्या वर्षभरापासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली-सराटी गाव मराठा आरक्षण आंदोलनाच केंद्र राहिलं आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच अंतरवाली-सराटीमध्ये आमरण उपोषणाला बसले होते. त्यांच्यासह समर्थकांवर पोलिसांचा लाठीमार झाला आणि अंतरावली-सराटी रातोरात चर्चेत आलं. या अंतरावाली-सराटीमध्ये आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांचे मोठे नेते भेट देऊन गेले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात महत्त्वाच्या बैठका आणि महत्त्वाचे निर्णय याच अंतरवाली-सराटीमधून घेतले जातात.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सुरुवात ज्या अंतरावाली-सराटीमधून झाली, ते घनसावंगी विधानसभा मतदारसंघात येतं. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर घनसावंगी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. मतदारसंघ फेररचनेआधी हा भाग अंबड विधानसभा मतदारसंघात यायचा. मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अंबड विधानसभा मतदारसंघाचं अस्तित्व संपुष्टात आलं. त्याऐवजी संपूर्ण घनसावंगी तालुका, अंबड आणि जालना जिल्ह्यातील काही गावांचा मिळून घनसावंगी हा नवा मतदारसंघ अस्तित्वात आला. घनसावंगी विधानसभा मतदारसंघ जालना जिल्ह्यात असला तरी लोकसभेसाठी तो परभणी लोकसभेच्या अंतर्गत येतो. जेव्हापासून घनसावंगी विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आला आहे, तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राजेश टोपे या मतदारसंघातून आमदार आहेत.

घनसावंगीच विधानसभेच समीकरण समजून घेण्याऐवजी लोकसभेचा निकाल समजून घेऊया

लोकसभा निवडणुकीत परभणीतून महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार संजय जाधव यांनी बाजी मारली. परभणीने नेहमीच शिवसेनेला साथ दिली आहे. याआधी सुद्धा संजय जाधवच परभणीमधून खासदार होते. परभणी, पाथरी, घनसावंगी, गंगाखेड, जिंतूर आणि परतूर हे सहा विधानसभा मतदारसंघ परभणी लोकसभा मतदारसंघात येतात. 2024 च्या लोकसभेला परभणीमध्ये महायुतीने एक वेगळी खेळी केली होती. महायुतीने परभणीत जातीय मतांच्या ध्रुवीकरणाच्या आधारावर राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकर यांना उमेदवारी दिली होती. पण ही खेळी चालली नाही. संजय जाधव तब्बल 1 लाख 34 हजार इतक्या मोठ्या फरकाने विजयी ठरले. संजय जाधव यांना 6,01,343 मतं मिळाली तर दुसऱ्या स्थानावर राहिलेल्या महादेव जानकर यांना 4,67,282 मतं मिळाली. लोकसभानिहाय सहा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये तीन-तीन अशी विभागणी आहे. तीन आमदार मविआचे तर तीन महायुतीचे आहेत. लोकसभेला गंगाखेड वगळता सर्व पाचही मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला आघाडी मिळाली. रासपचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या गंगाखेडमध्ये फक्त 6,711 मतांची निसटती आघाडी मिळाली.

घनसावंगीवर कुठल्या कुटुंबाच वर्चस्व?

घनसावंगीमध्ये गेल्या कित्येक वर्षापासून टोपे घराण्याच वर्चस्व आहे. आधी टोपे कुटुंब काँग्रेसमध्ये होते. पण 1999 साली शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली, तेव्हापासून टोपे कुटुंब पवारांसोबत आहे. राजेश टोपे मागच्या सलग पाच टर्मपासून घनसावंगी विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. त्यांनी महाराष्ट्र सरकारमध्ये विविध मंत्रीपद भूषवली आहेत. राजेश टोपे यांचे वडील अंकुशराव टोपे हे सर्वप्रथम 1972 साली त्यावेळच्या अंबड विधानसभा क्षेत्रातून आमदार झाले. त्यानंतर 1991 साली काँग्रेसच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक जिंकली. 2009 च्या आधी घनसावंगी विधानसभा मतदारसंघ अंबड विधानसभा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा. राजेश टोपे यांनी सर्वप्रथम 1999 साली अंबडमधून निवडणूक जिंकली. मतदारसंघ पूनर्रचनेनंतर 2009 साली पुन्हा ते इथून आमदार झाले. मागच्या 25 वर्षांपासून राजेश टोपे इथे आमदार आहेत.

टोपे कुटुंबाला कसला फायदा होतो?

घनसावंगीमध्ये टोपे कुटुंबाच सहकाराच जाळं आहे. त्याचा फायदा नेहमीच निवडणुकीच्या राजकारणात राजेश टोपे यांना झाला आहे. समर्थ सहकारी साखर कारखाना, सागर सहकारी साखर कारखाना, यशवंत सहकारी सूतगिरणी, समर्थ सहकारी बँक, मत्स्योदरी शिक्षण संस्था या माध्यमातून राजेश टोपे यांचा मतदारसंघात तळागाळात संपर्क आहे. घनसावंगीतील पंचायत समिती, स्थानिक नगर पंचायतीत राजेश टोपे यांचच वर्चस्व आहे.

राजेश टोपे यांचं व्यक्तीमत्त्व कसं आहे?

शांत, संयमी आणि अभ्यासू ही राजेश टोपे यांच्या व्यक्तीमत्त्वाची वैशिष्ट्य आहेत. राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकार असताना विविध मंत्रीपदं त्यांनी भुषवली आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच सरकार असताना राजेश टोपे आरोग्य मंत्री होती. त्यावेळी राजेश टोपे यांचा कस लागला होता. सगळ्या जगात कोरोनाच संकट असताना महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री म्हणून त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी होती. कोरोनापासून बचावासाठी ऑक्सिजन आणि रेमडेसिव्हीर सारखी इंजेक्शन महत्त्वपूर्ण ठरत होती. आरोग्य मंत्री म्हणून त्यांचं योग्य नियोजन करण्याची जबाबदारी राजेश टोपे यांच्यावर होती. आपल्या अभ्यासू स्वभावानुसार त्यांनी जबाबदारी चोखपणे निभावण्याचा प्रयत्न केला.

राजेश टोपे यांच्यासमोर कोणाचं आव्हान?

राजेश टोपे यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हिकमत उढाण यांचं आव्हान आहे. हिकमत उढाण हे राजेश टोपे यांना तुल्यबळ लढत देऊ शकतात. मागच्यावेळी उढाण यांचा अवघ्या तीन ते चार हजार मतांनी पराभव झाला होता. घनसावंगीमध्ये शेवटच्या फेरीपर्यंत चुरशीची लढत झाली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत दोन गट पडल्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात चार ऐवजी सहापक्ष झाले आहेत. त्यामुळे घनसावंगीमध्ये स्थानिक पातळीवर समीकरण सुद्ध बदललं आहे. शिवसेना फुटल्यानंतर सुद्धा हिकमत उढाण उद्धव ठाकरेंसोबत होते. मात्र, जो जिंकलाय त्याची जागा, या सूत्रानुसार घनसावंगीची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळाली. उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार एकत्र असल्यामुळे हिकमत उढाण यांना लढता येणार नव्हतं. म्हणून त्यांनी मागच्या महिन्यात ठाकरे गट सोडून शिवसेना शिंदे गटाचा झेंडा हाती घेतला. आता एकनाथ शिंदे गटाने त्यांना घनसावंगीमधून उमेदवारी दिली आहे.

यंदा घनसावंगीमध्ये लढाई कशी आहे?

घनसावंगीमध्ये आता चौरंगी लढत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राजेश टोपे, शिवसेना शिंदे गटाकडून हिकमत उढाण. भाजपाशी बंडखोरी करुन अपक्ष लढणारे सतीश घाडगे आणि ठाकरे गटाशी बंडखोरी करणारे शिवाजीराव चोथे. ते तेली समाजातून येतात. शिवसेनेचे जुने, निष्ठावंत अशी शिवाजीराव चोथे यांची ओळख आहे. वंचितकडून बळीराम खटके यांच्या पत्नी कावेरीताई खटके उमेदवार आहेत. घनसावंगीमध्ये यंदा जातीय ध्रुवीकरण मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. त्यामुळे राजेश टोपे यांच्यासाठी यंदाची निवडणूक सोपी नसेल. भाजपाकडून उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न करणारे सतीश घाडगे समृद्धी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. त्यांचा सुद्धा मतदारसंघात चांगला जनसंपर्क आहे. साखर कारखान्याच्या माध्यमातून विविध योजना आणल्या. सतीश घाडगे, शिवाजीराव चोथे, कावेरीताई खटके, किती मतं घेतात? त्यावर घनसावंगीमधून कोण निवडणूक येणार? ते ठरणार आहे.

जरांगे पाटील यांचा रोल महत्त्वाचा

लोकसभेला मनोज जरांगे फॅक्टर मराठवाड्यामध्ये चालला होता. विधानसभेला तोच फटका बसण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवाली-सराटी गाव याच घनसावंगी विधानसभा मतदारसंघात येतं. मनोज जरांगे पाटील यांची भूमिका महायुतीच्या विरोधात असल्याच याआधी दिसून आलं आहे. खासकरुन भाजपाला त्यांचा विरोध आहे. मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत, पण एकनाथ शिंदेंबद्दल ते बऱ्याचदा चांगलं बोलले आहेत. शिंदेंना त्यांनी जाहीर विरोध केलेला नाही. मनोज जरांगे पाटील यांनी आधी निवडणूक लढवायच ठरवलेलं. पण नंतर त्यांनी निर्णय बदलला. कोणाला पाडायचं? कोणाला निवडून आणायचं? हे ठरवणार असल्याच जाहीर केलं होतं. पण नंतर त्यांनी यावरुन सुद्धा माघार घेतली. घनसावंगीमध्ये मराठा मतदार बहुसंख्य आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

घनसावंगीमध्ये मत विभागणीचा फायदा कोणाला?

लोकसभेला घनसावंगी विधानसभा मतदारसंघात संजय जाधव यांना 89,914 तर महादेव जानकर यांना 59,656 मतं मिळाली होती. घनसावंगी विधानसभा मतदार संघातून 24 हजार 282 एवढं मताधिक्य मिळालं होतं. यात शिवसेनेच्या डॉ. हिकमत उढाण यांच्या व्यूहरचनेचा आणि स्थानिक पक्षीय बांधणीचा मोठा हात होता. पण तेच डॉ. हिकमत उढाण आता शिवसेना शिंदे गटाकडून लढत आहेत. त्यामुळे राजेश टोपे यांच्यासाठी हे आव्हान सोपं नाहीय. घनसावंगीमध्ये तिरंगी, चौरंगी लढत नेहमीच राजेश टोपे यांच्या पथ्यावर पडली आहे. 40 टक्के मतं आपल्याकडे आणि उर्वरित 60 टक्के मतांची विभागणी अशी राजेश टोपे यांची रणनिती असते. आता घनसावंगीमधली ही मतविभागणी कोणाच्या पथ्यावर पडते? ते येत्या 23 नोव्हेंबरलाच स्पष्ट होईल.

Non Stop LIVE Update
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला
खरी शिवसेना कोणाची? शिंदे की ठाकरेंची 'या' 51 जागांवर जनतेचा फैसला.
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी
बारामतीत काका-पुतण्या कोण पॉवरफुल? या 40 जागा ठरवणार खरी राष्ट्रवादी.
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?
महायुती-मविआमध्ये काँटे की टक्कर,मतदानानंतरच्या एक्झिट पोलचे आकडे काय?.
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?
पोल ऑफ पोल, मतदानानंतर राज्यात कोणाची सत्ता येणार? कोणाचा अंदाज काय?.
राज्यात महायुती-मविआत काँटे की टक्कर, 'लोकशाही रुद्र'चा एक्झिट पोल काय
राज्यात महायुती-मविआत काँटे की टक्कर, 'लोकशाही रुद्र'चा एक्झिट पोल काय.
राज्यात 'मविआ'ची सत्ता? कोणाला किती जागा? tv9 रिपोर्टर पोलचा अंदाज काय
राज्यात 'मविआ'ची सत्ता? कोणाला किती जागा? tv9 रिपोर्टर पोलचा अंदाज काय.
ZEE-AI Exit Poll : महायुती-मविआत कोणाला किती जागा? पोलची आकडेवारी काय?
ZEE-AI Exit Poll : महायुती-मविआत कोणाला किती जागा? पोलची आकडेवारी काय?.
Exit Poll राज्यात कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ? कोणाच पारडं जड?
Exit Poll राज्यात कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ? कोणाच पारडं जड?.
'लाडकी बहीण'चा निवडणुकीत महायुतीला फायदा होणार? काय म्हणाले तज्ज्ञ?
'लाडकी बहीण'चा निवडणुकीत महायुतीला फायदा होणार? काय म्हणाले तज्ज्ञ?.
राज्यात कुणाची सत्ता? मविआ की महायुती? एक्झिट पोलच्या आकडेवारीन हादरवल
राज्यात कुणाची सत्ता? मविआ की महायुती? एक्झिट पोलच्या आकडेवारीन हादरवल.