Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; काँग्रेसला मोठा झटका
Ghulam Nabi Azad : गुलाम नबी आझाद यांनी पक्षनेतृत्वावर अनेक सवाल उपस्थित केले आहेत. पार्टीचा नवा अध्यक्ष बाहुलं असेल, असा आरोप त्यांनी केला आहे. सर्व बड्या नेत्यांना साईड कॉर्नर केल्याचा आरोपही त्यांनी लगावला आहे.
नवी दिल्ली: काँग्रेस पक्षाची चोहेबाजूने वाताहात सुरू असतानाच काँग्रेसला (congress) आज पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. कपिल सिब्बल (kapil sibbal) यांनी काँग्रेसला रामराम केल्याची घटना ताजी असतानाच आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यामुळे काँग्रेसला मोठा झटका बसला आहे. गुलाम नबी आझाद यांना काही जबाबदाऱ्या देण्यात आल्या होत्या. त्यावर ते समाधानी नव्हते. आपल्या उंचीनुसार अत्यंत कमी दर्जाच्या जबाबदाऱ्या दिल्याचं त्यांनी पक्ष नेतृत्वाला बोलूनही दाखवलं होतं. मात्र, पक्ष नेतृत्वाने त्याची दखल न घेतल्याने अखेर त्यांनी आज काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. गुलाम नबी आझाद यांच्या राजीनाम्यामुळे जम्मू-काश्मीरमध्येच नाही तर पक्षाला राष्ट्रीय स्तरावर मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. गुलाम नबी आझाद यांनी पाच पानी राजीनामा पाठवून अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
गुलाम नबी आझाद यांनी पक्षनेतृत्वावर अनेक सवाल उपस्थित केले आहेत. पार्टीचा नवा अध्यक्ष बाहुलं असेल, असा आरोप त्यांनी केला आहे. सर्व बड्या नेत्यांना साईड कॉर्नर केल्याचा आरोपही त्यांनी लगावला आहे. तसेच पक्षाच्या दुर्दशेला त्यांनी राहुल गांधी यांनाच जबाबदार ठरवलं आहे. राहुल गांधी यांचं नेतृत्व पोरकट आहे. राहुल यांनी पक्षात आपलं म्हणणं मांडण्याचं स्वातंत्र्यही ठेवलं नाही. आता पक्षात केवळ नव्या अध्यक्षाच्या निवडीचा खेळ खेळला जातोय, असा हल्लाच आझाद यांनी चढवला आहे.
प्रस्ताव नाकारला
यापूर्वी 16 ऑगस्ट रोजी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांना केंद्र शासित प्रदेश असलेल्या जम्मू-काश्मीरच्या प्रचार समितीचा प्रमुख बनवलं होतं. मात्र, आझाद यांनी हा प्रस्ताव नाकारला होता. त्यानंतर राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेल्या रसूल वानीला जम्मू-काश्मीरच्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्ष बनवण्यात आलं होतं.