जळगाव: संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर तत्काळ कारवाई झालेली नाही. तक्रार आली आणि कारवाई झाली असंही झालेलं नाही. पत्राचाळ प्रकरणात गेल्या अनेक दिवसांपासून चौकशी सुरू होती, त्यांना अनेकदा समन्स आले. चौकशीला बोलावलं. पण त्यांनी सहकार्य केले नाही. म्हणून ईडी त्यांच्या घरी गेली. ईडी (ED) सहजासहजी अशी कारवाई करत नाही किंवा अटक करत नाही. नवाब मलिक आणि अनिल देशमुखांनाही संधी देण्यात आली होती. तशीच संधी संजय राऊतांनाही दिली गेली. पण त्यांनी टाळाटाळ केली. ईडीनं सखोल चौकशी करूनच त्यांना अटक केली, असं सांगतानाच संजय राऊत यांनी आता योग्य ती कागदपत्रे सादर करावीत. आपल्या पवित्रतेचे पुरावे द्यावेत. मग त्यांना कुणीही अटक करू शकणार नाही, असा टोला भाजपचे नेते गिरीश महाजन (girish mahajan) यांनी लगावला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतोय. हा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. विरोधकांना असं बोलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. जर समजा ईडीनं सूडबुद्धीने कारवाई केली तर मग न्यायालयाने देखील नवाब मलिक, अनिल देशमुख यांना दिलासा का दिला नाही?, असा सवाल गिरीश महाजन यांनी केला.
आपली चोरी पकडली गेली म्हणजे तो मुंबईचा, महाराष्ट्राचा आवाज दाबला जातोय, असं भावनिक आवाहन करून आता लोक फसणार नाहीत. लोकांनाही कळतंय कोणत्या प्रकरणात काय काय सुरू आहे. त्यामुळे तुम्ही कितीही म्हणा महाराष्ट्राचा आवाज दाबला जातोय. तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही. तुम्ही म्हणजे मराठी माणूस नाहीये. स्वतःला तुम्ही काय समजता? जरा अंतर्मुख होऊन विचार करा. महाराष्ट्रातील अनेक लोकांनी या निर्णयामुळे सुटकेचा निःश्वास सोडलाय. राऊत यांच्या विरोधात सबळ पुरावे आहेत म्हणून ईडीनं त्यांना अटक केली आहे, असं त्यांनी सांगितलं.
यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील आमदारांच्या याचिकेवरही भाष्य केलं. धनुष्यबाण नेमका शिंदे गटाचा की उद्धव ठाकरे गटाचा? पक्ष प्रमुख कोण? याची वाट आम्ही पण पाहतोय. ही सगळी न्यायालयीन प्रक्रिया आहे. पण मला असं वाटतं की यात शिंदे गटाची बाजू अगदी स्वच्छ आहे. विधानसभेत 166 मतं शिंदे गटाला मिळालेली आहेत. त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे. हे सर्व इन कॅमेरा झालेलं आहे. त्यामुळे यामध्ये काही वेगळा निर्णय होईल, असं मला कुठेही दिसत नाही. पण शिंदे गटाला यात न्याय मिळेल, असं दिसतंय, असंही ते म्हणाले.