Video : मंत्री गिरीश महाजनांचं जळगावात जंगी स्वागत, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर महाजनांचा भन्नाट डान्स; पुन्हा खडसेंवर निशाणा
कार्यकर्त्यांनी महाजनांना डान्स (Girish Mahajan Dance) करण्याचा आग्रह केला. सुरुवातीला नाही म्हणणाऱ्या महाजनांनी नंतर मात्र चांगलाच ठेका धरला. यापूर्वीही अनेकदा गिरीश महाजन यांना ढोल वाजवताना, लेझीम खेळताना आणि नाचताना पाहिलं आहे.
खेमचंद कुमावत, जळगाव : मंत्रिमंडळ विस्तारानंतर भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) आज पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघात पोहोचले. त्यावेळी कार्यकर्त्यांकडून महाजनांचं जंगी स्वागत (Warm Welcome) करण्यात आलं. हजारोंची गर्दी, ढोलताशाचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, जोरदार घोषणाबाजी अशा वातावरणात महाजनांची उघड्या जीपमधून मिरवणूकही काढण्यात आली. त्यावेळी कार्यकर्त्यांनी महाजनांना डान्स (Girish Mahajan Dance) करण्याचा आग्रह केला. सुरुवातीला नाही म्हणणाऱ्या महाजनांनी नंतर मात्र चांगलाच ठेका धरला. यापूर्वीही अनेकदा गिरीश महाजन यांना ढोल वाजवताना, लेझीम खेळताना आणि नाचताना पाहिलं आहे. यावेळी मात्र मंत्रिपदाचा आनंद महाजनांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
यावेळी महाजनांनी विविध विषयांवर भाष्य केलं. महाजन म्हणाले की, लवकरच कामाला सुरुवात करुन अडीच वर्षाचा बॅकलॉग भरुन काढायचा आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विकासाला गती मिळेल. चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलार यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी राज्यात अधिक बळकट होईल, असा दावाही महाजन यांनी केलाय.
‘खडसेंना खूप अपेक्षा होती की, मी मंत्री होईन, संत्री होईन, पण..’
तसंच पंकजा मुंडे कुठेही नाराज नाहीत. आज सकाळी त्या माझ्याशी बोलल्या. तसेच 16 ऑगस्टला आम्ही भेटणार आहोत, अशी माहिती महाजनांनी दिलीय. महाजन यांनी पुन्हा एकदा एकनाथ खडसेंवरही निशाणा साधला. एकनाथ खडसे यांना सध्या दुसरं कुठलं काम राहिलं नाही. टीका करणं हे एकमेव काम सध्या त्यांच्याकडे आहे. खडसेंना खूप अपेक्षा होती की, मी मंत्री होईन, संत्री होईन, पण ते काहीच झाले नाहीत. विरोधी पक्षनेता होईल असंही त्यांना वाटलं होतं पण तेही झाले नाहीत, असा टोला महाजनांची खडसेंना लगावलाय.
‘उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना भरकटली होती’
बंडावेळी काही गडबड झाली असती तर शहीद झालो असतो, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. त्याबाबत विचारलं असता महाजन म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या बोलण्याचा विपर्यास करु नका. देशात पहिल्यांदाच एका पक्षात इतकं मोठं बंड झालं असेल. भरकटलेल्या शिवसेनेला संजीवनी देण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलंय. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेना भरकटली होती. मूळ बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार बाजूला ठेवून शिवसेना पक्ष भरकटला होता. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना असल्याचा दावाही महाजन यांनी केलाय.