Bhagatsingh koshyari | नावात भगतसिंग इतकच कर्तृत्व, वरचा कोश रिकामा, राज्यपालांच्या वक्तव्यावरून मनसेचे गजानन काळेंचा हल्लाबोल
मराठी माणसाचा राज्यपालांनी जो अपमान केलाय, त्याबद्दल लवकरात लवकर माफी मागावी, असे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.
मुंबईः राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी मराठी माणसांबद्दल (Marathi people in Mumbai) केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा विविध राजकीय पक्षांतून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. मनसेचे नेते गजानन काळे यांनीदेखील राज्यपालांवर हल्लाबोल केला. यांच्या नावातच फक्त भगतसिंग आहे. एवढंच त्यांचं कर्तृत्व आहे. वरचा कोश रिकामाच, असा टोमणा गजानन काळे (MNS Gajanan Kale) यांनी मारला आहे. काळे यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करणारं ट्विट केलं आहे. राज्यपालांनी एका कार्यक्रमात केलेलं वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकांना बाहेर काढलं तर या भागात काहीच पैसा उरणार नाही, असं वक्तव्य राज्यपालांनी केल्याने मराठी भाषिकांकडून त्यांच्यावर टीका होत आहे.
गजानन काळेंचं ट्विट काय ?
मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विटमध्ये म्हटलंय, पुरे आता, यांनी घरी बसावं. मराठी माणसाला ज्ञान पाजळण्याच्या भानगडीत पडू नये. यांच्या नावात भगसिंग इतकंच यांचं कर्तृत्व. बाकी वरचा कोश रिकामाच दिसतोय… असा टोमणा त्यांनी मारला. राज्यपलांचं वक्तव्य हे अतिशय संतापदायक असल्याचं सांगत गजानन काळे यांनी त्याचा निषेध केला आहे.
गजानन काळेंचं ट्विट—-
पुरे आता … यांनी आता घरी बसावं … मराठी माणसाला ज्ञान पाजळण्याच्या भानगडीत पडू नये … नावात भगतसिंग इतकेच यांच कर्तृत्व बाकी वरचा कोश रिकामाच दिसतोय यांचा …#संतापजनक #निषेध pic.twitter.com/wGredZLmVJ
— Gajanan Kale (@GajananKaleMNS) July 30, 2022
संदीप देशपांडे काय म्हणाले?
मनसे नेते संदीप देशपांडे यांनीही यावर तिखट प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ‘ मला वाटतं, ज्या गोष्टीचा इतिहास आपल्याला कळत नाही, त्याविषयी बोलू नये. मराठी माणसांमुळे इतरांना फायदा झाला. इतरांमुळे महाराष्ट्राची प्रगती झाली नाही, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. ज्या गोष्टीचा इतिहास आपल्याला कळत नाही. इथे उद्योगधंदे आले. इंडस्ट्रीज डेव्हलप झाल्या. हे सगळं इथल्या मराठी माणसांनी केलेल्या नियोजनाचा परिणाम आहे. त्यांनी मेहनत घेतली म्हणून इथे इथे उद्योगधंदे आले. म्हणून तर हे राज्य इतर राज्यांपेक्षा जास्त प्रगत आहे. इतरांच्या प्रगतीत महाराष्ट्राचा हात आहे. आमच्या त्यांना स्पष्ट इशारा आहे. त्यांच्या पदाचा पूर्ण आदर राखतो. पण याचा अर्थ त्यांना जे वाटेल ते बोलतील असे आम्ही सहन करणार नाही. राज्यपाल हे भारतीय जनता पक्षाचे नाहीयेत. राज्यपाल स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. भारतीय जनता पक्षाची काय भूमिका असेल ते तो पक्ष ठरवेल…
राज्यपालांचं वक्तव्य काय?
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकुरांकडून निषेध
राज्यपालांचं हे वक्तव्य महाराष्ट्रद्रोही आहे. सातत्याने अशी वक्तव्य करणं राज्यपालांना शोभत नाही, अशी टीका माजी मंत्री आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे. राज्यपालांच्या वक्तव्याचा त्यांनी निषेध केला. महाराष्ट्राचा असा अपमान करणाऱ्या राज्यपालांना राष्ट्रपतींनी दुसरीकडे कुठेतरी हलवावे, अशी मागणी यशोमती ठाकूर यांनी केली.
महाराष्ट्राची माफी मागावी- अमोल मिटकरी
तर महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसले जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी माणसं आहोत. मराठी माणसाचा राज्यपालांनी जो अपमान केलाय, त्याबद्दल लवकरात लवकर माफी मागावी, असे ट्विट राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केले आहे.