Loksabh Election 2024 | मुंबईच्या ‘या’ मतदारसंघात गुजराती, जैन व्यापारी भाजपा उमेदवारावर नाराज
Loksabh Election 2024 | गुजराती, जैन हे भाजपाचे हक्काचे मतदार आहेत. नेहमीच गुजराती मतदार भाजपाच्या पाठिशी राहिला आहे. मुंबईत भाजपाचा विस्तार झाला, त्यामागे गुजरात मतदारांची साथ आहे. गुजराती, जैन व्यापारी वर्गाची भाजपाशी जवळीक आहे. पण आता हाच व्यापारी वर्ग उमेदवारीवरुन नाराज झाला आहे. लवकरच भाजपाला बैठक घेऊन त्यांची नाराजी दूर करावी लागेल.
मुंबई (गोविंद ठाकूर) : आगमी लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सात टप्प्यात मतदान होईल. 4 जूनला निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेचे 48 मतदारसंघ आहेत. पण अजूनही सर्व जागांसाठी उमेदवारांची घोषणा झालेली नाही. भाजपाने दोन आणि काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपाने दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नाव जाहीर केली आहेत. पण अन्य जागांसाठी अद्यापही उमेदवारांच्या नावाची घोषणा होऊ शकलेली नाही. महाविकास आघाडी आणि महायुती दोघांमधील जागावाटप रखडलेलं आहे. कुठल्या पक्षाच्या वाट्याला किती जागा येणार हेच अद्याप ठरत नाहीय. शिंदे गटाकडून कालपर्यंत उमेदवारांची यादी जाहीर होईल असं वाटलं होतं. पण अद्यापपर्यंत ही यादी जाहीर झालेली नाही. महायुतीमध्ये भाजपा मोठा भाऊ ठरणार हे निश्चित आहे. पण अजित पवार गट आणि शिंदे गटाला सन्मानजनक जागा हव्या आहेत. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाहीय.
भाजपाने मागच्यावेळी महाराष्ट्रात ज्या लोकसभेच्या जागा लढवल्या होत्या, त्या जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. यात मुंबईतील काही जागा आहेत. उत्तर मुंबईतून भाजपाने केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना उमेदवारी दिली आहे. उत्तर मुंबई हा भाजपासाठी सुरक्षित मतदारसंघ समजला जातो. हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे भाजपाने नेहमीच या जागेवर प्रयोग केले आहेत. बोरिवली, कांदिवली, गोरेगाव, जोगेश्वरीचा भाग उत्तर मुंबई मतदारसंघात येतो. आधी राम नाईक उत्तर मुंबईच लोकसभेत प्रतिनिधीत्व करायचे. मागच्या दोन टर्मपासून भाजपाचे गोपाळ शेट्टी येथून खासदार आहेत. 2019 लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांनी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना जवळपास साडेचार लाख मतांनी पराभूत केलं होतं.
व्यापाऱ्याच म्हणण काय?
भाजपाने आता उत्तर मुंबईतून पीयूष गोयल यांना तिकीट दिलं आहे. त्यावर बोरिवलीतील गुजराती, जैन व्यापाऱ्यांमध्ये नाराजीची भावना आहे. बाहेरचा उमेदवार दिल्याने ही नाराजीची भावना आहे. उत्तर मुंबई लोकसभा आणि बोरिवली विधानसभेत बाहेरच्या उमेदवारांवर गुजराती भाषिक मतदार आणि व्यापारी नाराज आहेत. काल बोरिवलीत गुजराती समाजातील मतदार आणि व्यावसायिकांनी बैठक घेऊन नाराजी व्यक्त केली. काँग्रेसने गोविंदा, संजय निरुपम यांना आणले. भाजपाने विनोद तावडे, सुनील राणे यांच्यानंतर पियुष गोयल यांना उमेदवार म्हणून पाठवले आहे. स्थानिक मतदारांची फसवणूक झाल्याची भावना आहे. या बैठकीला ज्येष्ठ समाजसेवक भरत एस शहा, समाजसेवक वीरेंद्र शहा, डॉ. निमेश मेहता, सामाजिक कार्यकर्ते ईबी मुल्ला, स्नेहल शहा, पुरोहित यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.