Eknath Shinde: ते 5 प्रश्न ज्यांची उत्तरं अजूनही एकनाथ शिंदे गटाकडे नाहीत, बंडखोर गटाच्या पहिल्या प्रेस कॉन्फरन्समध्येही उत्तर नाही
बंडखोरांवर कारवाईच्या पवित्र्यात असलेली शिवसेना आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात सत्ताधाऱ्यांविरोधात बंड पुकारणारी शिवसेना दोघांसमोरही मोठे कायदेशीर पेच निर्माण झालेत. त्यामुळे हे सत्ता नाट्य कधी संपणार, या प्रश्नाच्या उत्तराच्या अपेक्षेत अवघा महाराष्ट्र आहे.
मुंबईः अवघ्या महाराष्ट्राला खोळंबून ठेवणाऱ्या राजकीय नाट्याचा एक अंक नुकताच पार पडला. मागील तीन दिवसांपासून बैठकांवर बैठका सुरु असलेल्या गुवाहटीतून शिंदे (Eknath Shinde) गटातील आमदारांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत बोलताना बंडखोर आमदार दीपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी अनेक प्रश्नांतील त्यांच्या गटाची भूमिका स्पष्ट केली. एवढे दिवस, केवळ फोनवर आणि सूत्रांपर्यंत माहिती देणाऱ्या आमदारांनी प्रथमच आपले काही निर्णय जाहीर केले. आमच्या आमदारांवर शिवसेनेने (Shivsena MLA) कारवाईची नोटीस पाठवली असली तरीही आम्ही त्याला कोर्टात आव्हान देऊ. तसेच यानंतरही उद्धव ठाकरे आमचं ऐकतील अशी आम्हाला आशा आहे, असं वक्तव्य दीपक केसरकर यांनी केलं. आमदारांचं निलंबन असो की शिंदे गट, उद्धव ठाकरे गट असो.. महाराष्ट्राला शिवसेनेच्या अंतर्गत बंडाळींबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहेच. पण जनतेसमोर सध्या महत्त्वाचे प्रश्न पडलेत. सोशल मीडियातूनही या प्रश्नाची उत्तरं जाणून घेण्यासाठी संदेश फिरतायत. त्यांची उत्तरं शिंदे गटातील आमदारांनी आज तरी दिलेली नाहीत. ती प्रश्न कोणती?
1. एकनाथ शिंदे यांचा गट महाराष्ट्रात कधी येणार?
विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर रातोरात गायब झालेले आमदार आपापल्या मतदार संघात कधी परतणार, याकडे कार्यकर्ते आणि सामान्यांचे लक्ष लागले आहे. केवळ गुवाहटीत आमदारांची जमवा जमव करून आमच्याकडे दोन तृतीयांशांपेक्षा जास्त संख्याबळ असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र महाराष्ट्रात आल्यावर शिंदे गटाची ताकद कमी होईल, असं भाकित शरद पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनीही केलंय. त्यामुळे गुवाहटीतून शक्तीप्रदर्शन करणारा शिंदे गट महाराष्ट्रात कधी येतोय, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. याचं उत्तर आजच्या पत्रकार परिषदेतही देण्यात आलं नाही.
2. उद्धव ठाकरे हे तुमचे नेते आहेत की नाहीत?
आम्ही म्हणजेच शिवसेना असं शिंदे गट म्हणतोय. एकनाथ शिंदे हे गटनेते आहेत असं त्यांनी जाहीर केलंय. मात्र उद्धव ठाकरेंचं नेतृत्व त्यांनी अद्याप झिडकारलेलं नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे हे शिंदे गटाचे नेते आहेत की नाहीत, याबाबतही स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं नाही. उद्धव ठाकरे यांनी मात्र आपण वर्षा बंगला सोडला त्याप्रमाणे मुख्यमंत्री पद इतकच काय तर पक्षप्रमुख पदही सोडयला तयार आहोत, फक्त आमदारांनी समोर येऊन बोलावं असं आवाहन केलंय…
3. बंडामागे भाजपा आहे का?
महाराष्ट्रातून गुजरात आणि गुजरातहून आसामध्ये गेलेल्या शिंदे गटाच्या बंडावर एकच प्रश्न विचारण्यात येत आहे. एवढ्या मोठ्या बंडामागे नेमकी कुणाची मदत आहे. भाजप तुम्हाला पाठबळ देतंय का? यावर आतापर्यंत शिंदे गटानं स्पष्टपणे भाजपचं नाव घेतलेलं नाही. एक राष्ट्रीय पक्ष, महाशक्ती अशा प्रकारची विशेषणं वापरली गेली. मात्र यामागे भाजप असल्याचं स्पष्ट सांगितलं नाही. या प्रश्नाचं उत्तर कधी ना कधी बंडखोरांना द्यावंच लागेल.
4. तुम्ही नको हे उद्धव ठाकरेंना तोंडावर येऊन का सांगत नाहीत ?
आम्ही शिवसेनेतून बाहेरही पडणार नाही, नवा पक्षही स्थापन करणार नाहीत किंवा दुसऱ्या एखाद्या पक्षात शामिल होणार नाहीत, अशी काहीशा विचित्र अटी बंडखोरांच्या शिंदे गटानं घातल्या आहेत. त्यामुळे त्यांना नेमकं काय करायचंय, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. उद्धव ठाकरे यांनी त्यांना वारंवार सांगितलंय की तुम्ही आमच्या समोर येऊन सांगा, उद्धव ठाकरेंचं नेतृत्व नकोय म्हणून… पण अद्याप शिंदे गटानं ही हिंमत केलेली नाही. आमच्याकडे 40 पेक्षा जास्त शिवसेना आमदारांचं पाठबळ असल्याचं सांगतात पण हेच उद्धव ठाकरेंसमोर महाराष्ट्रात येऊन का सांगत नाहीत, किंवा एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत, असं थेट उद्धव ठाकरेंसमोर हे का सांगत नाहीत, हा प्रश्न अनुत्तरीतच आहे.
5. हे नक्की कधी संपणार?
मागील पाच दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु असलेलं हे सत्ता नाट्य आणखी किती दिवस चालणार, याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. गुवाहटीत थांबलेल्या आमदारांच्या बैठकीनंतर स्पष्ट निर्णय, भूमिका घेतल्या जातील, अशी अपेक्षा होती. मात्र आजच्या बैठकीनंतरही शिंदे गट पुढे काय करणार, याची स्पष्टता नाही. बंडखोरांवर कारवाईच्या पवित्र्यात असलेली शिवसेना आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात सत्ताधाऱ्यांविरोधात बंड पुकारणारी शिवसेना दोघांसमोरही मोठे कायदेशीर पेच निर्माण झालेत. त्यामुळे हे सत्ता नाट्य कधी संपणार, या प्रश्नाच्या उत्तराच्या अपेक्षेत अवघा महाराष्ट्र आहे.