नवी दिल्ली: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेटली. या भेटीत मुख्यमंत्र्यांनी मोदींशी सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा केल्याचीच अधिक चर्चा होती. त्यावरून प्रश्न विचारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पत्रकारांवरच संतापले. मोदींनाच भेटलो. मी काही नवाज शरीफांना भेटायला गेलो नव्हतो, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. त्यामुळे पत्रकारही काहीवेळ अवाक् झाले. (Had not gone to meet Nawaz Sharif, says CM Uddhav Thackeray)
मराठा, ओबीसी आणि पदोन्नतीतील आरक्षणासह इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी मोदी आणि ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळामध्ये पावणे दोन तास चर्चा झाली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी संवाद साधला. मात्र, यावेळी मोदी-ठाकरे यांच्या बंद दाराआडील चर्चेची जोरदार चर्चा होती. त्यानुषंगाने पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार केला. ‘मोदी आणि आमचे व्यक्तिगत संबंध आहेत. हे सर्वांना माहीत आहे. ही गोष्ट लपलेली नाही आणि लपवण्याची गरज नाही. आज आम्ही राजकीयदृष्ट्या एकत्र नाही. पण म्हणून आमचं नातं तुटलेलं नाही. मी मोदींना भेटलो म्हणजे काही तरी चूक केलं असं नाही. मी काही नवाब शरीफांना भेटलो नाही. आताही माझ्या सहकाऱ्यांना सांगून मी मोदींना भेटायला जाऊ शकतो’, असं सांगतानाच सत्तेत एकत्र नसलो तरी नातं तुटलं नाही, असं सूचक विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.
पंतप्रधानांना भेटण्यासाठी आम्ही तिघे आलो, सचिवहीसोबत आहेत. ही भेट अधिकृतच आहे. राज्याचे विषय कोणते, कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे सर्वांना माहीत आहे. सर्व विषय मोदींनी गांभीर्याने ऐकून घेतले. प्रत्येक विषयांची पत्रंही आम्ही दिली आहेत. राज्यांचे अनेक विषय मांडले. त्याबाबत मोदींनी लक्ष घालतो असं सांगितलं. मोदी हे प्रश्न सकारात्मकपणे सोडवतील अशी अपेक्षा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मधल्या काळात मला मोदींचा फोन आला होता. सरकार चांगलं काम करत आहे, असं ते म्हणाले होते. हे व्यक्तिगत बोलणच होतं. आजही आमची वैयक्तिक भेट झाली. यावेळी त्यांनी विचारपूस केली. मी त्यांना सहकाऱ्यांसोबत आलो असून राज्याचे प्रश्न आहेत असं सांगितलं, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. यावर उद्धव ठाकरेंना युती का तुटली? असा सवाल करण्यात आला. त्यावर, दीड वर्षाने यावर उत्तर का द्यावं?, असा उलट सवाल त्यांनी केला.
पंतप्रधान कार्यालयातून भेटीची वेळ मिळाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण पावणे अकरा वाजताच पंतप्रधान कार्यालयात पोहोचले. त्यानंतर 11 वाजता या तिन्ही नेत्यांची मोदींसोबत बैठक सुरू झाली. तब्बल पावणे दोन तास ही भेट झाली. त्यात मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात एकांतात अर्धा तास चर्चा झाली. या अर्धा तासात दोन्ही नेत्यांमध्ये काय खलबतं झाली? यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. (Had not gone to meet Nawaz Sharif, says CM Uddhav Thackeray)
संबंधित बातम्या:
VIDEO: मोदी-ठाकरे एकांतात भेटले; ‘ते’ 30 मिनिटे महाराष्ट्राच्या राजकारणाची कूस बदलणार?
मराठा आरक्षण ते मेट्रो कारशेड, मुख्यमंत्र्यांनी मोदींपुढे मांडल्या 11 मागण्या; वाचा सविस्तर
(Had not gone to meet Nawaz Sharif, says CM Uddhav Thackeray)