पुणे: शिवसेना (shivsena) आणि भाजपची (bjp) युती नैसर्गिक होती. महाविकास आघाडीसोबतची युती नैसर्गिक नव्हती, असं शिंदे गट आणि भाजपकडूनही वारंवार सांगितलं जात आहे. त्यावर ज्येष्ठ विचारवंत, प्राध्यापक हरी नरके (hari narke) यांनी सवाल केला आहे. एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत केलेली युती ही नैसर्गिक युती कशी काय होऊ शकते? जनतेने तुम्हाला म्हणजेच युतीला कौल दिला होता हे मान्य आहे. पण तो कौल तुमचाच पक्ष फोडण्यासाठी नव्हता, असा टोला हरी नरके यांनी शिंदे गटाला लगावला आहे. तुम्ही गुवाहाटी, सुरत असे पळत जात सत्तेत आलात. मग ही नैसर्गिक युती कशी काय? तुम्हाला जर भाजपसोबत नैसर्गिक युती करायचीच होती मग त्याला अडीच वर्षे का लागली? मग भाजपने अजित पवारांसोबत जे सरकार बनवलं होतं ती कोणती नैसर्गिक युती होती? किंवा जम्मू-काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तींसोबत बनवलेले सरकार कुठल्या नैसर्गिक युतीच्या अधिपत्याखाली होतं?, असा सवालच हरी नरके यांनी केला आहे.
हरी नरके मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी नैसर्गिक युतीच्या मुद्द्यावरून भाजप आणि शिंदे गटाला चांगलंच धारेवर धरलं. नैसर्गिक युतीच्या नावाखाली या सगळ्या यांच्या लबाड्या आहेत. हे लोक सत्तेसाठी काहीही करू शकतात. मुळात या लोकांचा कुणाचाच लोकशाहीवर विश्वास नाही. 2014 मध्ये सत्तेवर येताना जी आश्वासने यांनी दिली होती ती कधीच पूर्ण केली नाहीत, असा हल्लाबोलही नरके यांनी केला.
गेली महिनाभर आपण महाराष्ट्रामध्ये हे सत्तानाट्य पाहत आहोत आणि ही मंडळी गेली महिनाभर म्हणत होती की, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. त्यामुळे आम्ही ठाकरे घराण्यावर किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर कुठलीही टीका करणार नाही. पण परवापासून त्यांनी थेटपणे उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केली आहे. यातून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना मारण्याची नक्षलवाद्यांना सुपारी दिली होती असं सूचित करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे, असा संशय नरके यांनी व्यक्त केला. शिंदे साहेबांना झेड प्लस सिक्युरिटी दिली नव्हती असा आरोप त्यांनी करायला सुरुवात केली आहे. पण काल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शिंदेना झेड प्लस सिक्युरिटी दिली असल्याचे स्पष्ट केलं आहे, असं त्यांनी सांगितलं.
उद्धव ठाकरे यांच्यावर जे कमरेखालचे आरोप करतात ते मला कुठेतरी चारित्र्यहीन वाटत आहेत. एका बाजूला बाळासाहेबांचे नाव घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याच मुलावर टीका करायची हा चक्क खोटारडेपणा आहे. आतापर्यंत त्यांच्याकडून हे सांगितले गेले की, आम्ही उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना मानतो. कारण त्यांची नियुक्तीच बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. मग आता अचानक हे शोध कुठून लावत आहेत? असा सवाल त्यांनी केला. ठाकरे कुटुंबाला बदनाम करण ठाकरे कुटुंबाचे चारित्र्यहनन करणे हाच यामध्ये मला मोठा डाव दिसत आहे, असंही ते म्हणाले.
महागाई प्रचंड वाढली आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच या लोकांनी अन्नधान्यावर जीएसटी लावली आहे. अशावेळी फक्त धार्मिक भावना चिथावणाऱ्या गोष्टी समोर आणायच्या आणि लोकांना सांगायचं की आपला धर्म संकटात आहे. या सरकारने जनतेची केवळ फसवणूक केली आहे. भारतीय संविधानाने धर्मनिरपेक्षता लोकशाही आणि न्याय ही मूल्ये आपल्याला दिली आहेत. पण या लोकांचा मुळात लोकशाहीवर विश्वास नाही, असंही ते म्हणाले.
एकनाथ शिंदे यांना गुवाहाटीला घेऊन जाणारे मोहित कंबोज होते हे आपण पाहिलं आहे, आणि याच मोहित कंबोज याने 30 जानेवारी म्हणजेच महात्मा गांधींच्या शहिद दिवशी नथुराम गोडसे याचे फोटो आपल्या ट्विटरवर टाकले होते. यातना सरळ लक्षात येते की या लोकांचा ना कायद्यावर विश्वास आहे, ना शांततेवर, ना लोकशाहीवर. आणि म्हणून मला असं वाटतं की जनता जर उभी राहिली, या जनतेने जर सामूहिक शहाणपण दाखवलं, तर काहीतरी होऊ शकतं. कारण याच जनतेने इंग्रजांना देशाबाहेर घालवलं होतं. जनतेला माहिती आहे की या लोकांचा संविधानावर विश्वास नाही म्हणून लोकांनी त्यांना साठ वर्षे सत्तेपासून लांब ठेवलं होतं आणि नंतर ते सत्तेवर आले तेही खोटं सांगत आणि जनतेला फसवत आले आहेत. हे सरकार जर एकनाथ शिंदे आणि भाजपच आहे तर गेल्या 15 ते 20 दिवसात ज्या गोष्टी झाल्या त्या फक्त भाजपने सांगितलेल्या गोष्टी का झाल्या असा प्रश्न येथे उद्भवतो. मग हे सरकार नेमकं भाजपच आहे का? असा सवालही त्यांनी केला.