Kirit Somaiyya | 1500 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्यात हसन मुश्रीफांची चौकशी, लोकायुक्तांद्वारे 24 ऑगस्टला सुनावणी
सदर चौकशीचे आदेश राज्यपालांनी दिल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. 24 ऑगस्ट रोजी लोकायुक्त यांच्यासमोर गूगल मीट या अॅप्लीकेशनवर मुश्रीफ यांनी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी मंत्रिपदावर असताना भ्रष्ट पद्धतीने जावयाच्या कंपनीला 1500 कोटी रुपयांचे कंत्राट मिळवून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी हा भ्रष्टाचार उघडकीस आणला होता. आता या प्रकरणाची लोकायुक्तांद्वारे चौकशी सुरु झाली आहे. तसेच लोकायुक्तांसमोर (Lokayukt) येत्या 24 ऑगस्ट रोजी यासंदर्भातील सुनावणी होईल. त्यामुळे मंत्रिपदाच्या कारकीर्दीत केलेला भ्रष्टाचाराचा हिशोब हसन मुश्रीफ यांना द्यावाच लागणार, असं वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केलंय. यासंदर्भातील एक ट्विट सोमय्या यांनी केलंय. तसेच त्यासोबत लोकायुक्तांचे पत्रही त्यांनी ट्विट केलेय.
किरीट सोमय्यांचे आरोप काय?
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माजी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबावर मागील वर्षी भ्रष्टाचाराचा आरोप केला. त्यांच्या मते मुश्रीफ यांच्या कुटुंबियांनी तब्बल 100 कोटी रुपयांचा घोटाळा केलाय. मुश्रीफ यांच्या कुटुंबियांकडे 47 कंपन्यांकडून पैसे आले असून कोणत्या कंत्राटदारांकडून हा पैसा आला, याची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकार असताना केली होती. तसेच मुश्रीफांची बेनामी सपत्ती जप्त करा, अशी मागणीदेखील त्यांनी केली होती. शेल कंपन्यांतून मुश्रीफ यांच्याकडे हा पैसा आला असून ठाकरे सरकारने या प्रकरणी चौकशी का केली नाही, असा सवाल तेव्हा किरीट सोमय्यांनी केला होता. भारत सरकारने मुश्रीफांविरोधात पुणे सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती.



#HasanMushriff ₹1500 crore Grampanchayat Tender to DAMAD Son in Law Co Scam Hearing at Lokayukta on 24 August हसन मुश्रीफ 1500 कोटी ग्रामपंचायत मंत्रालयचा-जावई चा कंपनीला कॉन्ट्रॅक्ट 24 ऑगस्ट रोजी लोकायुक्त येथे सुनावणी@Dev_Fadnavis @mieknathshinde @cbawankule @girishdmahajan pic.twitter.com/5WSc1z0Nfo
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) August 19, 2022
24 ऑगस्ट रोजी सुनावणी
किरीट सोमय्या यांनी आता हसन मुश्रीफ यांच्याविरोधात लोकायुक्तांमार्फत चौकशी होणार असल्याची माहिती आज ट्विटरद्वारे दिली. यासंदर्भातील एक पत्रही त्यांनी ट्विट केलंय. त्यानुसार, हसन मुश्रीफ यांचे जावई मतीन मंगोली यांच्याशी संबंधित जयोस्तुते प्रा. लि. कंपनीला राज्यातील ग्रामपंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदा यांचे रिटर्न्स भरण्याकरिता देण्यात आलेल्या 1500 कोटींच्या ठेक्यात झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याबाबत लोकायुक्तांनी चौकशी सुरु केल्याचे म्हटले आहे. सदर चौकशीचे आदेश राज्यपालांनी दिल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. 24 ऑगस्ट रोजी लोकायुक्त यांच्यासमोर गूगल मीट या अॅप्लीकेशनवर मुश्रीफ यांनी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे.