मुंबई: शिवसेनेच्या आमदार फुटीवरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी थेट भाजपवर (bjp) हल्ला चढवला आहे. आमदार फुटीमागे भाजपचंच कारस्थान आहे. भाजपच्या कारस्थानाशिवाय भाजपशासित राज्यात आमदार डांबून ठेवणं शक्यच नाही, असा थेट आणि गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला. तसेच ईडीच्या (ED) भीतीने आणि अमिषाने हे आमदार पळाले आहेत. स्वत: वाघ किंवा बछडे म्हणणारे पळपुटे निघाले, असा जोरदार हल्लाबोलही त्यांनी केला आहे. संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. जे आमदार पक्ष सोडून गेले, ते कोणत्या परिस्थितीत पक्ष सोडून गेले याचा खुलासा लवकरच होईल. आमचे दोन आमदार पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यात ते त्यांच्यासोबत काय काय घडलं आणि इतर आमदारांना कशी वागणूक दिली जातेय याची माहिती देतील, अशी माहितीही त्यांनी दिली.
बंडखोर कोण आहेत? शिवसेना पक्ष स्वतंत्र आहे. विधीमंडळ पभक्ष वेगळा आहे. ईडीच्या भीती आणि अमिषाला बळी पडून काही आमदार पळाले असतील. विशेषत: जे स्वत:ला बछडे, वाघ समजून घ्यायचे, ते म्हणजे पक्ष नाही. आपण जो काल रस्त्यावर पाहिला तो पक्ष आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षावरून मातोश्रीवर गेले. जाताना जे वातावरण होतं. ती शिवसेना आहे. हा पक्ष मजबूत आहे. आजही लाखो लोक आमच्यासोबत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात पक्ष मजबूत आहे. चार आमदार, अजून कोणी दोन खासदार, दोन नगरसेवक गेले म्हणजे पक्ष गेला असे नाही होत. हे का गेले सोडून याची कारणं लवकरच समोर येतील. तरीही त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्यातील काही लोक आमच्या संपर्कात आहेत, असं राऊत यांनी सांगितलं.
आज आमचे दोन आमदार पत्रकार परिषद घेत आहेत. आज दुपारी 12 वाजता शिवालयात पत्रकार परिषद घेतील. 17 ते 18 आमदार भाजपच्या कब्जात आहेत. मी भाजप हाच शब्द वापरतो. कारण त्यांच्या कारस्थानाशिवाय भाजप शासित राज्यात आमदारांना डांबून ठेवणं शक्य नाही, असा दावाही त्यांनी केला.
जे ईडीच्या भीतीने पक्ष सोडतात ते बाळासाहेब ठाकरेंचे भक्त होऊ शकत नाहीत. आमचा एक मंत्री चार दिवसापासून ईडीच्या कार्यालयात जातोय. पण त्याने पक्ष सोडला नाही. जेव्हा फ्लोअर टेस्ट होईल तेव्हा सर्वांची टेस्ट होईल. कोण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे. हे कळेलच, असंही ते म्हणाले.