दम असेल तर पाटीवरचं बापाचं नाव काढा, बाळासाहेबांचं नाव लावा, मराठवाड्यातून शिंदेसेनेला कुणाचं आव्हान?
उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यातून दौऱ्याची सुरुवात करा, असं म्हटलं. त्यामुळे मी हिंगोलीतून सुरुवात केली. कोकणापेक्षा मराठवाड्यातील शिवसेनेचा भगवा जास्त ठिकाणी भडकवेन, असा विश्वास भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.
हिंगोलीः कोकणातले शिवसेना नेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी आज थेट मराठवाड्यातून शिंदेसेनेला (Shivsena) आव्हान दिलं. 40 गद्दारांनी विश्वासघात केला. बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) विचारांसाठी गद्दारी केल्याचं हे लोक म्हणतायत. पण गद्दारांना माझं आव्हान आहे. तुमच्यात दम असेल तर घराच्या पाटीवरचं तुमच्या बापाचं नाव काढा आणि बाळासाहेबांचं नाव लावा, असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं. हिंगोलीत आज त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यासहित इतर आमदारांवर जोरदार टीका केली.
संतोष बांगर यांच्यावर नाव न घेता त्यांनी टीका केली. रडले, बायका सोडून जातील म्हणाले, हे सगळे अस्वलाचे चाळे होते, अशी टीका जाधव यांनी केली.
काय म्हणाले भास्कर जाधव?
शिंदेसेनवर टीका करताना भासकर जाधव म्हणाले, तुम्हाला बाळासाहेबांचा आणि शिवसेनेाच स्वाभिमान होता तर मंत्रीपदाची शपथ घेताना तसं का बोलले नाहीत.? उद्धव ठाकरेंच्या निर्णयामुळेच तुम्ही मागच्या अडीच वर्षात मंत्री झाले. पण हिंदुत्वासाठी नव्हे तर स्वार्थीपणासाठी तुम्ही शिंदे गटात गेले, असं वक्तव्य भास्कर जाधव यांनी केलं…
‘…हनुमान चालिसा वाचायचा असता’
भास्कर जाधव यांनी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्यावरही टीका केली. हनुमान चालिसाच्या आग्रहावरून त्यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केलीय. अमरावतीतील एक मुलगी बेपत्ता होती. हे लव्ह जिहादचं प्रकरण असल्याचा आरोप राणा यांनी केलाय. त्यावरून पोलीस आणि नवनीत राणा यांची जोरदार खडाजंगी झाली.
यावर टीका करताना भास्कर जाधव म्हणाले, तुला एवढी मुलीची काळजी होती तर हनुमान चालीसा म्हणायची नं.. पोलिसात कशाला गेली, असा सवाल जाधव यांनी केला.
‘मुस्लिम समाजाने डोके शांत ठेवावे’
गणेशोत्सव काळात याकूब मेमनच्या कबरीचा विषय काढून भडकवण्याचं काम केलं गेलं. मात्र मुस्लिम बांधवांनी डोकं शांत ठेवावं, घटनांचा अभ्यास करावा, असं आवाहन जाधव यांनी केलं.
उद्धव ठाकरेंनी मराठवाड्यातून दौऱ्याची सुरुवात करा, असं म्हटलं. त्यामुळे मी हिंगोलीतून सुरुवात केली. कोकणापेक्षा मराठवाड्यातील शिवसेनेचा भगवा जास्त ठिकाणी भडकवेन, असा विश्वास भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.