Haryana Election Result : फक्त 126 दिवसात बाजी पलटली, भाजपाने अशक्य वाटणारी गोष्ट शक्य कशी करुन दाखवली
Haryana Election Result : हरियाणा विधानसभा निवडणुकीतील विजय फक्त त्या राज्यातल्या भाजपा कार्यकर्त्यांपुरता मर्यादीत नाहीय, देशभरातील भाजपासाठी हे विजयाच टॉनिक आहे. कारण सलग 10 वर्ष सत्तेवर असल्यामुळे हरियाणात शेतकरी वर्गात, अग्निवीर योजनेवरुन युवकांमध्ये मोठी नाराजी होती. मात्र, असं असूनही भाजपाने आपली सत्ता टिकवली. आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी हे टॉनिक आहे. फक्त 126 दिवसात भाजपाने चित्र कसं पालटलं ते जाणून घ्या.
4 जून 2024 आणि 8 ऑक्टोबर 2024 मध्ये फरक काय? हा प्रश्न तुम्हाला विचारला, तर तुमचं उत्तर असेल ‘126 दिवसांच अंतर’. पण हेच 126 दिवस भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाचे होते. याच 126 दिवसात भाजपाने नैराश्य ते उत्साह असा प्रवास केला. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला. त्यामध्ये भाजपाला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता आला नाही. म्हणून जिंकूनही भाजपावर बरीच टीका झाली. तेच 8 ऑक्टोंबरला हरियाणा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. भाजपा हरियाणामध्ये तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने सरकार बनवणार आहे. हरियाणाच्या विजयासह भाजपाने 126 दिवसात जबरदस्त बाऊन्सबॅक केलय.
हरियाणा विधानसभा निवडणूक भाजपासाठी कुठल्या कठीण टास्कपेक्षा कमी नव्हती. 10 वर्ष सरकारमध्ये राहिल्यामुळे भाजपाला एकाबाजूला प्रस्थापित सरकारविरोधी लाटेचा सामना करावा लागत होता. दुसरीकडे भाजपाला लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसने केलेल्या पराभवाची परतफेड करायची होती. शेतकरी आंदोलन, अग्निवीर या मुद्यांवरुन काँग्रेसने भाजपाला घेरलेलं. भाजपाने काँग्रेसला त्यांच्याच जाळ्यात अडकवलं. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने संविधान संपवणार असा प्रचार चालवलेला. भाजपाने सुद्धा तीच पण उलटी चाल खेळली. काँग्रेस सत्तेवर आली तर दलितांवर अत्याचार वाढेल असा संदेश दलितांपर्यंत पोहोचवला.
भाजपाने असा फिरवला गेम
भाजपाने मोठ्या जनसभांऐवजी छोट्या-छोट्या सभा घेऊन हरियाणाच्या जनतेला समजावण्याचा प्रयत्न केला. डबल इंजिन सरकारच्या योजनांबद्दल लोकांपर्यंत माहिती पोहोचवली. भाजपाने बूथ मॅनेजमेंटवर विशेष काम केलं. संपूर्ण निवडणूक जाट विरुद्ध बिगर जाट कशी होईल, याकडे लक्ष दिलं. काँग्रेसमधील अंतर्गत कलह भाजपाच्या पथ्यावर पडला. भाजपा आपल्या रणनितीमध्ये यशस्वी ठरली. भाजपा आता तिसऱ्यांदा हरियाणामध्ये सरकार स्थापन करणार आहे. भाजपाने या निवडणूक विजयासह लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून झालेल्या पराभवाचा बदला सुद्धा घेतला आहे.
भाजपाने दिग्गज नेत्यांच्या सभा कमी का केल्या?
लोकसभा निवडणुकीनंतर हरियाणा विधानसभा निवडणूक भाजपाची पहिली आणि मोठी अग्निपरिक्षा होती. विधानसभा निवडणुकीच्या सहा महिने आधी मुख्यमंत्री बदल करण्यात आला होता. मनोहर लाल खट्टर यांना हटवून त्यांच्याजाही नायब सिंह सैनी यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, तरीही भाजपाला विशेष फायदा होताना दिसत नव्हता. भाजपा अंतर्गत अस्वस्थतता होती. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाच्या अन्य नेत्यांनी हरियाणामध्ये कमी जनसभा घेतल्या. भाजपाचा पराभव होणार असच सर्वांना वाटत होतं. एक्झिट पोलचे आकडे सुद्धा तेच सांगत होते. पण प्रत्यक्षात भाजपाने बूथ मॅनेजमेंटवर सगळा फोकस केलेला.